व्यायाम करणे उत्तम आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते हे आपल्या सगळ्यांना माहित असते. मात्र नेमकी सुरुवात कुठून करायची ते अनेकांना माहित नसते. किंवा माहित असले तरीही रोजच्या रुटीनमधून वेळ काढणे अवघड होऊन बसते. पण लहानपणी मारलेल्या दोरीच्या उड्या आपण मोठेपणी पूर्णपणे विसरुन जातो. पण ही गोष्ट ऐकून तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल. कारण दोरीच्या उड्या मारणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. यामुळे तुमच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो आणि कॅलरीज जळण्यासही मदत होते. विशेष म्हणजे या व्यायामासाठी जागा, विशेष खर्च, खूप जास्त वेळ असे काहीच लागत नसल्याने तो कोणालाही सहज करता येऊ शकतो. पाहूयात काय आहेत दोरीच्या उड्यांचे उपयोग…

१. दिड महिना सलग दररोज १० मिनिटे दोरीच्या उड्या मारल्या तर ते रोज ३० मिनिटे जॉगिंग करण्याइतके परिणामकारक असते. यामुळे हा व्यायाम करणाऱ्याची हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

२. दोरीच्या उड्यांमध्ये आपल्या संपूर्ण शरीराला व्यायाम होत असल्याने इतर कोणत्याही व्यायामापेक्षा हा व्यायाम अतिशय महत्त्वाचा ठरतो. सलग ठराविक वेळ दोरीच्या उड्या मारल्यास त्याचा शरीराला अतिशय चांगला उपयोग होतो. यासाठी वयाचेही बंधन नसते.

३. रोईंग आणि पोहणे यानेही जितक्या कॅलरीज बर्न होत नाहीत त्याहून कित्येक पटींनी जास्त कॅलरीज दोरीच्या उड्या मारल्याने जळतात. त्यामुळे हा उत्तम व्यायामप्रकार असल्याचे काही अभ्यासांतून समोर आले आहे.

४. दोरीच्या उड्या मारल्याने आपण खूप दमतही नाही आणि या व्यायामाला अतिशय कमी जागा आणि वेळ लागतो. त्यामुळे हा व्यायामप्रकार सर्वार्थाने सोयीचा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.