सध्या भारतासारख्या विकसनशील देशातही किमती कमी होत असल्याने स्मार्टफोनचे प्रमाण वाढत आहे, पण आईवडीलच जर स्मार्टफोन व्यसनासारखा वारंवार वापरीत असतील तर त्यांच्या पाल्य पालन कौशल्यावर परिणाम होतो. मुले भावनिक पातळीवर आईवडील किंवा पालकांपासून दूर जातात असे एका अभ्यासात निष्पन्न झाले आहे.
संशोधकांनी म्हटले आहे की, जेव्हा आईवडील किंवा पालकच स्मार्टफोनवर जास्त वेळ घालवतात तेव्हा लहान मुले त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात पण आईवडील त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात.
अल्प प्रतिसाद
बोस्टन वैद्यकीय केंद्राच्या संशोधकांनी १५ स्थानिक फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये जाऊन निरीक्षण केले असता त्यांना अनेक कुटुंबातील सदस्यांमध्ये वेगळ्याच प्रकारचे संबंध दिसून आले. मुलांना त्यांच्या आईवडिलांकडून काहीही प्रतिसाद मिळत नव्हता कारण ते स्मार्टफोन वापरण्यात गुंतलेले होते.
बोस्टन वैद्यकीय केंद्राच्या डॉ. जेनी एस.राडेस्की यांनी केलेल्या संशोधनानुसार मुले व त्यांचे आईवडील यांच्या क्रिया-प्रतिक्रियांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. किमान ५५ कुटुंबांपैकी ४० कुटुंबातील आईवडील हे स्मार्टफोन वापरण्यात गुंतलेले दिसून आले. टायपिंग, स्वायपिंग , फोन कॉल करणे यात ते गढून गेले होते.
जेवतानाही स्मार्टफोन
तीन पैकी एक आईवडील हे जेवतानाही स्मार्टफोनचा वापर करीत होते. काही मुलांना आईवडील स्मार्टफोन जेवतानाही वापरत आहेत हे आवडत नव्हते. त्यामुळे ते शांतपणे जेवत होते, काही आईवडिलांच्या या सवयीवर भडकले होते. काही मुले जिंगल बेल्स, बॅटमन सेल्स अशी गाणी म्हणून वडिलांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत होते.
स्मार्टफोनच्या वापराची तीव्रता व मुलांच्या प्रतिक्रिया यांचा थेट संबंध मात्र यात दिसून आला नाही. त्यामुळे मुलांबरोबर असताना आपण स्मार्टफोन वापरू नये, त्यांच्या नैसर्गिक संवादाला प्रतिसाद द्यावा पण स्मार्टफोन अगदीच वापरू नये असे नाही; जरूरीपुरता वापरावा, असे राडेस्की यांचे म्हणणे आहे. ‘जर्नल पेडियॉट्रिक्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
स्मार्टफोनचे हे दुष्परिणाम, तोटे लगेचच जाणवत नसले तरी संवेदनाक्षम मुलांच्या भावविश्वात अशा प्रकारांची वेगळीच प्रतिक्रिया उमटू शकते. मुलांमध्ये एकलकोंडेपणा, मोठय़ांचा आदर न करणे, आई वडिलांपासून दूर जाणे, त्यांचा सन्मान न करणे आदी तोटे, दुष्परिणाम सामाजिक स्तरावर उमटण्याची भीती जाणकार व्यक्त करीत आहेत. स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या भारतासारख्या देशात तर हा धोका अधिक जाणवण्याची चिन्हे दिसत आहेत.
स्मार्टफोनमुळे मुलांशी संबंधांत दुरावा
सध्या भारतासारख्या विकसनशील देशातही किमती कमी होत असल्याने स्मार्टफोनचे प्रमाण वाढत आहे, पण आईवडीलच जर स्मार्टफोन व्यसनासारखा वारंवार वापरीत असतील तर त्यांच्या पाल्य पालन कौशल्यावर परिणाम होतो.

First published on: 12-03-2014 at 03:05 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smartphone reduce love relationship with the child