तुम्ही डिप्रेशनचे शिकार आहात का, याचे उत्तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये दडल आहे. तुम्ही फोनवर घालवलेला वेळ आणि तुमच्या ‘जिओग्राफिकल लोकोशन’चा अभ्यास करून याबाबतचे निदान करता येणे शक्य असल्याचे एका नवीन पाहाणीतून सिद्ध झाले आहे. सतत फोनवर वेळ घालविणे हे तुमच्या डिप्रेशनच्या व्याधीचे द्योतक असल्याचे नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. त्यानी केलेल्या पाहणीत सर्वसाधारणपणे दर दिवशी ६८ मिनिटे फोनवर घालवणाऱ्या व्यक्ती डिप्रेशन ग्रस्त होत्या. तर डिप्रेशनच्या शिकार न झालेल्या व्यक्ती साधारणपणे प्रत्येक दिवशी १७ मिनिटांपर्यत फोनचा वापर करत असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर फोनमधील ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम’ (जीपीएस)चा वापर करून केलेल्या पाहणीत फोनवर जास्त वेळ घालविणाऱ्या व्यक्ती फार काळ बाहेर न जाता बहुतांश वेळा घरातच असल्याचे आढळले. हे निरीक्षण डिप्रेशन व्याधीच्या लक्षणाशी मेळ घालणारे आहे. यांच्या दिनक्रमात वेळेचे बंधन नसल्याचेदेखील दिसून आले, जसे ऑफिसला वेळेवर न जाणे.
या संशोधनात २८ व्यक्तींच्या फोन वापराची आणि जीपीएस लोकेशनची पाहणी दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ करण्यात आली. ज्यात २० स्त्रिया आणि ८ पुरुषांचा समावेश होता. त्यांचे सरासरी वय २९ वर्षे इतके होते.
त्यांच्या फोनमध्ये बसविण्यात आलेला ‘सेंन्सर’ दर पाच मिनिटांनी त्यांच्या लोकेशनची आणि मोबाईल वापराची माहिती संशोधकांकडे पाठवत असे. ‘नॉर्थवेस्टर्न’च्या संशोधकांनी या माहितीच्या आधारे डिप्रेशनची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींवर शिक्कामोर्तब केले. सांख्यिकी पातळीवर सांगायचे झाले तर हा निष्कर्ष ८७ टक्के इतका अचूक होता.
कोणतेही प्रश्न न विचारता एखादी व्यक्ती डिप्रेशनची शिकार झाली आहे अथवा नाही हे ओळखता येऊ शकते हे या पाहणीचे यश असल्याचे नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाच्या ‘बिहेविरल इंटरव्हेनशन टेक्नॉलॉजी’ केंद्राचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डेव्हिड मोर म्हणाले. आता आपण स्मार्टफोनच्या माध्यमातून एखादी व्यक्ती डिप्रेशनग्रस्त आहे अथवा नाही याचे निदान करू शकत असल्याचे सांगत, पारंपरिक प्रश्नोत्तरांपेक्षा स्मार्टफोनकडून मिळणारा हा डेटा डिप्रेशनचे निदान करण्यासाठी अधिक भरवशाचा असल्याची माहिती शास्त्रज्ञ सोरोब साएब यांनी दिली. या पाहणीत डिप्रेस व्यक्ती अनेक वेळा घर सोडून बाहेर पडत नसल्याचे समोर आले असून, डिप्रेशनमधील कुठेही न जाण्याच्या इच्छेचे हे लक्षण आहे. जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेस असते, तेव्हा ती अलिप्त रहाणे पसंत करते, बाहेर पडून काही करण्याची उमेद संपलेली असते आणि तिच्यातील उर्जा नाहिशी झालेली असल्याचे मोर म्हणाले.
या पाहणीतील फोन वापराबाबतच्या माहितीतून फोनचा कशाप्रकारे वापर केला जातो, हे ज्ञात झाले नसले, तरी फोनवर जास्त वेळ घालवणाऱ्या व्यक्ती फोनवर बोलण्यापेक्षा नेटसर्फींग अथवा गेम खेळत असल्याचा अंदाज मोर यांनी व्यक्त केला आहे. मोबाईल फोनचा अधिक वापर करणारी व्यक्ती जीवनातील दुःख, ताण, तणाव आणि त्रास इत्यादींचा समर्थपणे सामना करू शकत नसल्याने ती असे करते. परिस्थितीला टाळणे हे एक डिप्रेशनचे लक्षण असल्याचे मोर म्हणाले.

Story img Loader