अमेरिकी आरोग्यतज्ज्ञांचे संशोधन
धूम्रपानाच्या अतिरेकामुळे कर्करोग किंवा क्षयरोग होऊ शकतो, हे अनेकांना माहीत आहे. पण अधिक प्रमाणात धूम्रपान केल्यामुळे त्यापासून ‘टाइप टू मधुमेह’ होऊ शकतो, असे संशोधन अमेरिकेतील आरोग्यतज्ज्ञांनी केले आहे.
हार्वर्ड विद्यापीठातील सार्वजनिक आरोग्य विभाग, चीनमधील हुआजोंग विद्यापीठ आणि सिंगापूरमधील नॅशनल विद्यापीठ यांनी संयुक्तपणे हे संशोधन केले आहे.
मधुमेह झालेल्या काही रुग्णांचा त्यासाठी अभ्यास करण्यात आला. सातत्याने धूम्रपान करणाऱ्या ११.७ टक्के पुरुष रुग्ण आणि २.४ टक्के महिलांना टाइप टू मधुमेह झाल्याचे या संशोधनात लक्षात आले. जगभरात सुमारे दोन कोटी ७८ लाख रुग्णांना मधुमेह असून, त्यापैकी अनेकांना केवळ धूम्रपानाच्या अतिरेकामुळे मधुमेह झाला आहे, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला.
धूम्रपान सोडल्यानंतर किंवा कमी केल्यानंतर या रुग्णांपैकी अनेकांचा मधुमेहाचा धोका कमी झाल्याचेही लक्षात आले.
‘‘सातत्याने धूम्रपान करणे हे सार्वजनिक आरोग्यास बाधा आणते. धूम्रपानाने मधुमेह होऊ शकतो हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे धूम्रपानापासून सुटका करून घेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावयास हवे, त्यासाठी जनजागृतीचीही गरज आहे,’’ असे हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि हे संशोधन करणाऱ्या गटाचे प्रमुख फ्रँक हू यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा