धूम्रपान करणारे लोक आपल्या आयुष्यमानात वाढ करू शकतात. मात्र त्यासाठी धूम्रपान सोडण्याची आवश्यकता आहे, असे एका संशोधनात समोर आले आहे.
सत्तर अथवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्ती जर धूम्रपान करत असतील तर त्यांना मृत्यू येण्याचे प्रमाण हे धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींपेक्षा तीनपट अधिक असते. अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्था (एनआयएच)च्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे.
यासाठी संशोधकांनी ७० अथवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या १ लाख ६० हजार व्यक्तींची माहिती घेऊन अभ्यास करण्यात आला. यासाठी धूम्रपान करणाऱ्यांची आणि त्यांच्या मृत्यूबाबतची माहिती २००४-०५ पासून घेण्यात येत होती. यात ५६ टक्के जण धूम्रपान सोडलेले, तर ६ टक्के धूम्रपान करत असलेल्यांचा सहभाग होता. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले, तर धूम्रपान करण्यास वयाच्या १५ व्या वर्षांपासून सुरुवात होते. हे प्रमाण १९ टक्के पुरुषांच्या तुलनेत ९.५ टक्के स्त्रिया असे आहे.
याचा सरासरी प्रत्येक ६.४ वर्षांनंतर पाठपुरावा केल्यानंतर धूम्रपान करणाऱ्यांपैकी १६ टक्के जणांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. धूम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत प्रत्येक पातळीवर महिलांचा मृत्युदर कमी असल्याचे दिसून आले.
मृत्यू होण्यासाठी वय आणि ते किती वेळ धूम्रपान करत आहे, यावर कारणीभूत असल्याचे संशोधनात म्हटले आहे. हे संशोधन ‘अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेन्शन मेडिसिन’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)