सिगारेट आदी तंबाखूजन्य उत्पादनांच्या वेष्टनावर, या पदार्थाचे सेवन अथवा धूम्रपान हे समाजाला मान्य नाही, ते निषिद्ध मानले जात असल्याचा इशारा दिल्यामुळे हे पदार्थ घेणाऱ्यांचा सदसद्विवेक जागा होऊ शकतो. यामुळे ते या व्यसनांचा विळखा सोडवून घेऊ शकतील, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.
विशेषत: ज्यांच्यात धूम्रपान ही आपली ओळख असल्याची किंवा ते सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण असल्याची भावना तयार झालेली नाही, अशा लोकांमध्ये हा उपाय चांगला लागू पडत आहे. ‘जर्नल ऑफ कन्झ्युमर अफेयर्स’मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
याबाबत कॅनडामधील वेस्टर्न विद्यापीठाचे जेनिफर जेर्फी यांनी सांगितले की, कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास बंदी यांसारख्या तंबाखूविरोधी उपाययोजनांत सामाजिक दबाव हा धूम्रपान सोडवण्याचा एक उपाय म्हणून वापरला जातो. धूम्रपानविरोधात असाच सामाजिक दबाव निर्माण करण्याचा दुसरा मार्ग म्हणून तंबाखूजन्य पदार्थाच्या वेष्टनाकडे पाहिले जात आहे. आमच्या प्रारंभिक संशोधनात ते दिसून आले आहे, असे जेर्फी यांनी सांगितले.
या अभ्यासात धूम्रपान करणाऱ्या १५६ ज्येष्ठ अमेरिकी नागरिकांवर ऑनलाइन प्रयोग करण्यात आला. त्यांना दाखवण्यासाठी दोन प्रकारची वेष्टने तयार करण्यात आली होती. त्या दोन्हींवरही ‘धूम्रपान करणाऱ्यांकडे लोक या दृष्टीने पाहतात’ असाच संदेश होता, पण त्यावरील चित्रे वेगळी होती. यात तटस्थपणे पाहणाऱ्या व्यक्ती आणि नाराजी व्यक्त करणाऱ्या व्यक्तींची कृष्णधवल छायाचित्रे होती. प्रयोगात सहभागी व्यक्तींना विशिष्ट क्रम न लावता यापैकी एक वेष्टन दाखविण्यात आले होते.