अनेक जणांना झोपेत घोरण्याची सवय असते. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत बऱ्याच जणांना ही समस्या सतावते. घोरणे ही एक सामान्य समस्या आहे, असा विचार करून त्याकडे सहजरित्या दुर्लक्ष केले जाते. परंतु ही गंभीर आजाराची लक्षण देखील असू शकतात. त्यामुळे याबाबतीत वेळीच सावध होण्याची गरज आहे.
शरीरातील टीशूच्या कंपनामुळे घोरण्याची समस्या उद्भवतात. झोपलेले असताना स्नायू शिथिल होऊन वायुमार्ग शिथिल करतात. जेव्हा आपण झोपेत श्वास घेतो किंवा सोडतो तेव्हा टीशूची उघडझाप होते आणि त्याचा आवाज येतो. घशातील स्नायू आणि टिशूच्या आकारामुळे घोरण्याची शक्यता असते.
आणखी वाचा : सणांच्या दिवसात जास्त जेवणे ठरू शकते नुकसानदायक; हे सोपे उपाय करून टाळा धोका
या गंभीर आजरांचे लक्षण असू शकते
स्ट्रोक
तुम्ही दररोज रात्री जितक्या जोरात आणि जास्त वेळ घोरता तितका स्ट्रोकचा धोका जास्त असतो. घोरणे हे धमनीच्या नुकसानाचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हृदयविकाराचा झटका
स्लीप एपनिया असलेल्या लोकांना कोणतेही हृदयविकार होण्याची आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता दुप्पट असते, अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
मानसिक आरोग्याची समस्या
स्लीप एपनियाचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अपुर्ण झोप गंभीर नैराश्याचे कारण बनु शकते.
डोकेदुखी
संशोधकांना सकाळी होणारी डोकेदुखी, निद्रानाश आणि स्लीप एपनिया यांमध्ये झोपेच्या विकारांमधील संबंध आढळला. त्यामुळे जर घोरण्यामुळे तुमची झोप पुर्ण होत नसेल तर यावर तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
मधुमेहाचा धोका
येल युनिव्हर्सिटीने मधुमेह आणि स्लीप एपनिया यांच्यातील संबंधांवर केलेल्या अभ्यासानुसार, ज्या व्यक्ती मोठ्या आवाजात आणि नेहमी घोरतात त्यांना ज्या व्यक्ती अजिबात घोरत नाहीत त्यांच्या तुलनेत मधुमेह होण्याची शक्यता ५०% जास्त असते.
आणखी वाचा : रात्रीच्या जेवणात ‘या’ पदार्थांचा समावेश चुकूनही करू नका; ठरतील आरोग्यास धोकादायक
हे आजार टाळण्यासाठी पुढील उपाय करता येतील
लठ्ठपणा हे घोरणे आणि स्लीप एपनियाचे मुख्य कारण आहे. जर तुम्ही वजन नियंत्रणात ठेवले तर घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळु शकते. पाठीवर झोपल्याने वायुमार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो. परिणामी श्वास घेताना घोरण्याचा आवाज येतो. अशा परिस्थितीत पाठीवर झोपणे टाळावे. तसेच जास्त घोरणाऱ्या व्यक्तींना अल्कोहोल टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण अल्कोहोलमुळे घोरण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)