आपण स्वयंपाक करण्यापूर्वी छोले (चणे), राजमा , मूग डाळ, हरभरा डाळ का भिजवतो? असा प्रश्न तुमच्या मनात कधी ना कधी तर आलाच असेल. कडधान्य भिजवल्यानंतर त्यांचे पदार्थ बनवण्यासाठीचा वेळ देखील वाचतो आणि ते पदार्थ पचवण्यासाठी सोपं बनतात, हे कारण तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. परंतु हे पदार्थ काही तास भिजवण्याचे इतरही काही फायदे आहेत. जाणून घेऊयात सविस्तर…
आयुर्वेद तज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत या विषयावर मार्गदर्शन केलंय. या पोस्टमध्ये त्यांनी स्वयंपाक करण्यापूर्वी डाळी आणि कडधान्य भिजवण्याच्या पद्धतीच्या फायद्यांविषयी सांगितलं आहे. या पोस्टमध्ये लिहिताना त्यांनी त्यांच्या आवडीच्या मूग डाळीबद्दल माहिती शेअर केली आहे. अतिशय कमी वेळेत जेवण बनवण्यासाठी आणि पचन देखील सोपं करण्यासाठी मूग डाळ हा एक उत्तम पर्याय असल्याचं त्यांनी म्हटलंय.
यापुढे या पोस्टमध्ये लिहिताना त्यांनी सांगितलं की, जर तुम्हालाही मूड डाळ आवडत असेल आणि कधी कधी जेवण करण्याचं सूचत नसेल तर तुम्ही स्वयंपाक करण्यापूर्वी दररोज मूग डाळ भिजवून घ्या. डाळी आणि कडधान्य भिजवण्याचे फायदे आणि ते आरोग्य कसे सुधारतात याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, यात फायटिक अॅसिड आणि टॅनिन काढून टाकण्यास मदत होते. तसंच शरीरातील पोषक घटकांचे शोषून घेण्यास मदत करतात.
पचन, पोषकतत्वाचं शोषण सुधारतं
डाळी आणि कडधान्ये भिजवल्याने पचन आणि पोषकतत्व शोषून घेण्याची क्षमता सुधारते. याच कारणासाठी डाळी आणि कडधान्य योग्य पद्धतीने खाणं गरजेचं असतं. शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी पोषकतत्व गरजेचे असतात. म्हणून जर तुम्हाला उपयुक्त पोषकतत्व ग्रहण करायचे असेल तर भिजवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. मोड न काढलेल्या कडधान्यामध्ये तीन अशोषक द्रव्ये असतात. ती म्हणजे टॅनीन, फायटीक अॅसीड आणि ट्रिप्सीन इनहीबीटर. टॅनीनमुळे लोहाच्या शोषणमध्ये अडथळा निर्माण होतो आणि फायटीक आम्लामुळे चुण्याचे शोषण कमी होते. ट्रिप्सीन इनहीबीटरमुळे ट्रिप्सीन नावाच्या एन्जाइम (विकर) निर्मीतीमध्ये अडथळा येतो. त्यामुळे कडधान्याचे पचन नीट होत नाही आणि पोट जड होते.
या पोस्टमध्ये डॉ. भावसार यांनी डाळी आणि कडधान्य भिजवण्याच्या वेळेबद्दल देखील माहिती शेअर केली आहे. मूग, तुर, मसूर, उडदाची डाळ ही कमीत कमी ८ ते १२ तास भिजवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. इतर डाळी किमान ६ ते ८ तास भिजवण गरजेचं आहे. राजमा, चणा किंवा छोले सारखे जड कडधान्य किमान १२ ते १८ तास भिजवावेत. सर्वसाधारणपणे कोणत्याही डाळी आणि कडधान्ये रात्रभर भिजवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. तसंच दुपारच्या वेळी भिजवलेले हे पदार्थ खाणं सर्वात उत्तम असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय.
डाळी आणि कडधान्य भिजवून ठेवल्यानंतर त्यातल्या पाण्याचं काय करायचं असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. या प्रश्नांचे उत्तर सुद्धा डॉ. भावसान यांनी या पोस्टमध्ये दिलंय. डाळी आणि कडधान्य भिजवल्यानंतर या पाण्यात टॅनिन किंवा फायटिक अॅसिड जात असल्याने ते आपण पुन्हा वापरू शकत नाही. त्यामुळे ते पाणी आपण आपल्या घरात लावलेल्या झाडांना देण्यासाठी वापर करू शकतो. अशा प्रकारे तुमच्या घरातील वनस्पतींनाही थोडे पोषण मिळेल.