जगभरात दरवर्षी दोन लाख नव्या कुष्ठरुग्णांची नोंद होत असून यापैकी निम्म्याहून अधिक भारतातील असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेतर्फे शुक्रवारी देण्यात आली. प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास कुष्ठरोग पूर्णत: बरा होतो; पण कुष्ठरोगाबद्दल असलेले गैरसमज, रुग्णाकडे पाहण्याचा समाजाचा चुकीचा दृष्टिकोन आणि त्याला मिळणारी भेदभावाची वागणूक हे या रोगाचा अंत घडविण्याच्या प्रयत्नांमधील सर्वात मोठे अडथळे असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व भागाच्या प्रादेशिक संचालक पूनम खेत्रपाल सिंग यांनी ही माहिती दिली. कुष्ठरुग्णांबाबत भारताने केलेल्या दोन वैधानिक तरतुदींचेही त्यांनी स्वागत केले. कुष्ठरुग्णांशी भेदभाव करण्यास प्रतिबंध आणि हा रोग झाल्याच्या पाश्र्वभूमीवर घटस्फोट घेण्यास कायदेशीर मुभा, अशा या तरतुदी आहेत.
सिंग यांनी सांगितले की, दक्षिण-पूर्व आशिया, ब्राझिल, आफ्रिकेचा सहारा भाग आणि पॅसिफिक या प्रदेशांत मोठय़ा प्रमाणावर कुष्ठरुग्ण आढळले आहेत.
जगभरात कुष्ठरुग्णांचे एकूण प्रमाण सातत्याने कमी होत असले तरी, दरवर्षी सुमारे दोन लाख नव्या रुग्णांची नोंद होत आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमार्फत अशा रुग्णांचा शोध घेणे, सुधारित उपचार आणि उपचार घेणाऱ्यांची सातत्याने माहिती ठेवणे या उपाययोजनांमुळे कुष्ठरुग्णांची संख्या घटून त्याचा प्रसारही कमी होत आहे. अशा वेळी रुग्ण आणि समाज यांच्यातील संबंधांत सुधारणा होण्याच्या प्रयत्नांना चालना मिळण्याची गरज सिंग यांनी व्यक्त केली. कुष्ठरोग निर्मूलनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने २०१६ ते २०१० पर्यंतचे धोरण निश्चित केले आहे. त्यामध्ये कुष्ठरुग्णांशी भेदभाव होऊ नये, रोगाबाबतचे पूर्वग्रह दूर व्हावेत, कुष्ठरोग हा शाप किंवा त्या व्यक्तीवरील कलंक मानला जाऊ नये यासाठीच्या उपाययोजना केंद्रस्थानी आहेत, असे त्यांनी सांगितले.