रविवार २१ जून रोजी भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण तर महाराष्ट्रात खंडग्रास ग्रहण पाहण्याची पर्वणी आहे. समाजातील प्रचलित समजुती बाजूला ठेवून प्रत्येकाने हा आनंद लुटावा. मात्र त्याआधी थोडी काळजी घ्या. दक्षता घ्या. केवळ डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नका. सूर्य प्रकाशातील अतिनील किरणांनी डोळ्यांतील कॉर्निया या नाजूक पटलास इजा होऊन दृष्टिदोष निर्माण होऊ शकतो. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे धोकादायक असते, असा इशारा खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक येथील खगोल-अभ्यासक डॉ. गिरीश पिंपळे यांनीही सूर्य ग्रहण पाहाताना काय काळजी घ्यावी आणि कसं पाहावं याबद्दल सांगितलं आहे. ग्रहण पाहण्यासाठी भारतीय मानक संस्थेने प्रमाणित केलेले गॉगल्स सर्वात चांगले. मात्र, सूक्ष्म-छिद्र कॅमेरा (पिन होल कॅमेरा) वापरून आपण ते पाहू शकतो. आणखी एक सोपा मार्ग म्हणजे गहू चाळायची चाळणी वापरणे. ग्रहणाच्या वेळेस ही चाळणी सूर्यकिरणे लंबरूप पडतील अशी धरायची. चाळणीखाली काही अंतरावर एखादा पांढरा सपाट कागद धरायचा. गंमत म्हणजे चाळणीला जेवढी भोके असतात तेवढे छोटे सूर्य आपल्याला दिसू लागतात आणि (मोठय़ा) सूर्याला ग्रहण लागले की या छोटय़ा सूर्यानादेखील ग्रहण लागते! या छोटय़ा सूर्याचा तुम्ही कॅमेऱ्याने/ मोबाइलने सहजपणे फोटो घेऊ शकता.

कुठे पाहता येईल?

भारतातून पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांतून ते कंकणाकृती स्वरूपात दिसेल. हा ग्रहणपट्टा २१ कि.मी. रुंदीचा असेल. या पट्टय़ात जोशीमठ, डेहराडून, कुरुक्षेत्र अशी काही प्रमुख शहरे आहेत. उर्वरित भारतातून हे ग्रहण खंडग्रास दिसेल. मुंबईमध्ये सकाळी १० वा. १ मि. या वेळेस ग्रहणाला प्रारंभ होईल. ११ वा. ३८ मि. ही ग्रहण मध्याची वेळ आहे. म्हणजे त्या वेळेस सूर्य सर्वाधिक ग्रासलेला असेल. दुपारी १ वा. २८ मि. या वेळेस ग्रहण समाप्त होईल. महाराष्ट्रातील इतर शहरांसाठी या वेळांमध्ये अवघ्या काही मिनिटांचाच फरक असेल. या काळात सूर्य आकाशात खूप उंच म्हणजे जवळजवळ डोक्यावर असेल.

महाराष्ट्रातून कंकणाकृती ग्रहण कधी दिसणार?

हे सूर्यग्रहण भारताप्रमाणेच आफ्रिका, दक्षिण पूर्व यूरोप, मिडलइस्ट, इंडोनेशिया, मायक्रोनेशिया येथून दिसेल. यापूर्वी मागीलवर्षी २६ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती दक्षिण भारतातून दिसली होती. त्यावेळीही उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसले होते. यानंतर पुन्हा भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा योग २१ मे २०३१ रोजी येणार आहे. त्या ग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातून दिसणार आहे. महाराष्ट्रातून सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसण्याचा योग मात्र खूप उशीरा म्हणजे ३ नोव्हेंबर २४०४ रोजी येणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solar eclipse 2020 surya grahan how view solar eclipse safely nck