लग्न हा आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो. हे लग्न विशेष आणि सगळ्यांपेक्षा वेगळे व्हावे यासाठी एकाहून एक कल्पना लढवल्या जातात. मग हे लग्न खास करण्यासाठी अमाप पैसाही खर्च केला जातो. मागच्या काही काळात भारतात डेस्टीनेशन वेडिंगची नवीन फॅशन आली आहे. अगदी बॉलिवूडमधील कलाकारांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सगळ्यांनाच सध्या या डेस्टीनेशन वेडिंगचे वेड लागले आहे. आपल्या जवळपास असलेल्या एखाद्या ठिकाणी जाऊन लग्नाचे सगळे विधी करण्याची सध्या पद्धत आहे. नुकतेच रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांनी इटलीतील लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली. तर आता प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे राजस्थान येथे विवाहबंधनात अडकणार आहेत. भारतातही अशीच काही स्वस्तात मस्त डेस्टीनेशन वेडिंगची ठिकाणे आहेत.
देवी गड – उदयपूर
ही जागा लग्नासाठी अतिशय उत्तम असून अतिशय रोमॅंटीक आहे. याठिकाणी अनेक बगिचे आणि स्विमिंग पूल आहेत. तसेच लग्नासाठी आवश्यक असणारा पारंपरिकपणा आणि आधुनिक सोयीसुविधा यांचे उत्तम असे मिश्रण याठिकाणी तुम्हाला मिळू शकते. या ठिकाणाच्या मागे असणारे पॅलेस अतिशय कौशल्यपणे उभारल्याचे दिसते.
रामबाग पॅलेस – जयपूर
राजस्थान हे वेगवेगळ्या प्रकारच्या पॅलेससाठी ओळखले जाणारे राज्य आहे. तुम्हाला तुमचे लग्न सर्वांना लक्षात राहील अशा ग्रँड पद्धतीने साजरे करायचे असेल तर हे ठिकाण उत्तम पर्याय आहे. ४७ एकरांच्या परिसरात पसरलेल्या या पॅलेसमध्ये एकावेळी असंख्य जण राहू शकतात. जयपूरचा ऐतिहासिक वारसा दाखवणारी रचना हे या पॅलेसचे वैशिष्ट्य आहे. याठिकाणी मोठे जिने, धबधबा, अतिशय उत्तम पद्धतीने रचना केलेले गार्डन आहे.
द लीला- गोवा</strong>
गोवा हे देशातील नागरिकांसाठी नाही तर परदेशातील नागरिकांसाठीही पर्यटनाचे स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी असणारे एकाहून एक असे समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालणारे आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी लग्न करण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. नारळाची उंचच उंच झाडी, समुद्राच्या लाटा आणि मंद वारा अशा वातावरणात लग्नगाठ बांधणे हा नक्कीच सुखद अनुभव ठरु शकतो.
लिलता महाल – मैसूर
मैसूरमधील अपरिचित अशा गावात असणारा पांढरा शुभ्र असा महाल हे लग्नासाठी एक उत्तम ठिकाण आहे. दूरवर पसरलेले बगिचे, महालातून दिसणारा मैसूर शहराचा नजारा आणि महालाची एकूण बांधणी आपल्याला नक्कीच वेड लावणारी आहे. त्यामुळे लग्नासाठी तुम्ही डेस्टीनेशन वेडिंगचा पर्याय निवडणार असाल तर हा नक्कीच उत्तम पर्याय ठरु शकतो. त्यातही पारंपरिक दक्षिण भारतीय जेवण हे समिकरण आणखीच उत्तम ठरेल.
निमराना फोर्ट – अलवार
दिल्ली-जयपूर महामार्गावर उंच अशा टेकडीवर हा किल्ला आहे. ऐतिहासिक वाटेल अशी ही वास्तू लग्नासाठी निश्चितच उत्तम ठिकाण आहे. मोकळ्या आकाशाखाली चांदण्यांमध्ये रात्रीच्या वेळचे लग्न असेल तर हा पर्याय अतिशय उत्तम आहे.