मायक्रोसॉफ्टचा गेमिंग ‘एक्सबॉक्स वन’ भारतात लवकरच उपलब्ध होणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने सांगून बराच कालावधी झाला परंतु, अजूनही एक्सबॉक्स वनच्या प्रतिक्षेतच भारतीय गेमिंग चाहते आहेत. याचीच कदाचीत संधी साधून सोनीने मायक्रोसॉफ्टला मागे सारत आपला ‘प्लेस्टेशन ४’ येत्या १८ डिसेंबरला भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्याचे जाहीर केले आहे.     
सोनीच्या प्लेस्टेशन-३ या उत्पादनानंतर एक पाऊल पुढे टाकत अत्याधुनिक आणि मायक्रोसॉफ्टच्या ‘एक्सबॉक्स वन’ला कडवी टक्कर देणारा ‘प्लेस्टेशन ४’ तयार केला आहे.
प्लेस्टेशन-३ ची तांत्रिक रचना बुचकळ्यात पाडणारी असल्यामुळे त्यातील गेम्स बनविणे जरा कठीण गेले होते. याची खबरदारी घेत सोनीने प्लेस्टेशन-४ मध्ये एएमडी प्रोसेसर वापरून ग्राहकांना व ‘गेमिंग डेव्हलपर्स’ला वापरण्यास सोयीस्कर जाईल याची काळजी घेतली आहे.
सोनीचा प्लेस्टेशन-४ भारताच्या आधी अमेरिकेत १५ नोव्हेंबरला दाखल झाला होता. त्यापाठोपाठ युरोप, ऑस्ट्रेलियातही सोनीचा प्लेस्टेशन-४ दाखल झाला. यासर्व ठिकाणी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे भारतातही प्लेस्टेशन-४ ला तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा सोनी कंपनीने व्यक्त केली आहे. अमेरिकेत प्लेस्टेशन-४ ची किंमत ४०० डॉलर (२५,०००रू) इतकी आहे.