जपानी वैज्ञानिक एक नवीन मोटार तयार करीत असून त्यात चालकाला जर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असेल तर त्याची आगाऊ सूचना देण्याची व्यवस्था आहे. या मोटारमध्ये इलेक्ट्रोकार्डियोग्राफिक निरीक्षणासाठी दोन विद्युत ध्रुव असून, सुकाणू चाकावर काही संवेदक लावलेले आहेत त्यामुळे चालकाच्या रक्तवाहिन्यांमधील स्पंदने तपासली जात असतात. निप्पॉन मेडिकल स्कूलचे मानद प्राध्यापक टकाव काटो यांनी सांगितले की, गाडी चालवताना हृदयविकाराने होणारे मृत्यू टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. या गाडीत जेव्हा चालक स्टिअरिंग व्हीलवर असेल तेव्हा त्याचा इलेक्ट्रो कार्डियोग्राम व हृदयाची स्पंदने सतत मोजली जातील व ही माहिती विश्लेषित केली जाईल, काही धोकादायक लक्षणे दिसली तर चालकाला आवाजी सूचना दिली जाईल. मोटारीची दिशादर्शन यंत्रणाही यात महत्त्वाची भूमिका पार पाडेल व वाहन रस्त्याच्या कडेला घेतले जाईल असे क्योडो या वृत्तसंस्थेने काटो यांच्या हवाल्याने म्हटले आहे. संशोधकांनी व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशन किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका आहे अशा ३४ व्यक्तींचा इलेक्ट्रोकार्डियोग्राम हॉल्टर मॉनिटर परिधान केलेला असताना घेतला. त्यात हृदयाचे ठोके नोंदले जात होते. त्यातील २० जण मरण पावले व त्याचे विश्लेषण केले असता ३१ जणांमध्ये सारखीच लक्षणे हृदयविकाराच्या अगोदर एक-दोन तास दिसली होती. जर हृदयविकाराच्या लक्षणांमुळे पूर्वसूचना मिळत असेल तर त्यामुळे चालकाला सावध करता येऊ शकते, या यंत्रणेमुळे चालकाला नुसते हृदयविकाराच्या झटक्याची शक्यताच कळणार नाही तर  खूप आधीच त्यांना त्याची सूचना मिळणार आहे. शोधक मंडलातील (सर्किट) माहिती अधिक स्पष्ट असेल तर हे काम अधिक चांगल्या प्रकारे करता येईल, असे डेन्सो कार्पोरेशनचे वरिष्ठ अभियंता सुयोशी नाकागावा यांनी म्हटले आहे. या यंत्रणेची अचूकता वाढवण्यासाठी संशोधकांनी चालकाच्या आसनाला इलेक्ट्रोड लावले असून चालकाने स्टिअरिंग व्हीलवर हात ठेवताच त्याचा इलेक्ट्रोकार्डिओग्राम काढणे सुरू होईल, तुम्ही एका हाताने गाडी चालवलीत तरी तुम्हाला हा धोका आधीच कळेल व सतर्क होता येईल.

Story img Loader