पर्यटन
दक्षिण आफ्रिकेतल्या पर्यटनाची खरी ओळख म्हणजे जंगल आणि वन्यजीव. पण त्याबरोबरच बंगी जम्पिंग, शार्क केज डायव्हिंगसारखे साहसी खेळ पर्यटकांना दक्षिण अफ्रिकेकडे ओढत घेऊन जातात.
दक्षिण आफ्रिकेतील प्लेटेनबर्ग बेपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेला ब्लोक्रॉन्स नदीवरचा पूल. या पुलावरून वाहने जातात तेव्हा पुलाच्या खाली गिनिज बुकमध्ये नाव नोंदवलेला साहसी खेळ सुरू असतो हे कळतदेखील नाही. जिवाचा थरकाप उडवणाऱ्या आणि या खेळात भाग घेणाऱ्यालाच नव्हे तर पाहणाऱ्याला देखील ‘धस्स्’ करून सोडणारा बंगी जम्पिंग हा साहसी क्रीडा प्रकार लोकप्रिय आहे. जगातील सर्वात उंच व्यावसायिक बंगी जम्पिंग इथे दक्षिण आफ्रिकेतील ब्लोक्रान्स नदीवरील पुलाखाली केले जाते. २१६ मीटर उंचीवरून उडी मारण्याचा हा अवघ्या पाच ते दहा मिनिटाचा खेळ, पण त्याचा अनुभव घ्यायचाच असा एकदा तुम्ही निश्चय केला तर ती स्वर्गीय सुखाचा आनंद देणारी अनुभूती असते. यात सहभागी होण्यासाठी, मनाची तयारी होण्यासाठी पर्यटक थोडा वेळच घेतो. आश्चर्य म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या भारतीय पर्यटकांपैकी बंगी जम्पिंग करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचेच प्रमाण अधिक आहे. एकूण भारतीय पर्यटकांपैकी ९० टक्के महिला या साहसी क्रीडाप्रकारात सहभागी होतात. आयुष्यभर ही आठवण जपून ठेवली जाते ती आयोजकांकडून मिळणाऱ्या दृश्यचित्रणातून. १९९७ पासून या साहसी क्रीडाप्रकाराची सुरुवात झाली आणि जगभरात तो लोकप्रिय झाला. अर्थात इथे सुरक्षेची काटेकोर काळजीदेखील घेतली जाते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यविषयक मापदंडातून उत्तीर्ण झाल्यानंतरच हा साहसी प्रकार अनुभवता येतो.
या देशातली साहसाची दुसरी अनुभूती म्हणजे ‘शार्क केज डायव्हिंग’. दक्षिण अफ्रिकेतल्या गन्सबई येथील शार्क केज डायव्हिंग म्हणजे समुद्रात पाण्याखालील माशांचे जग अनुभवण्याची संधी. व्हाइट शार्क प्रोजेक्ट ही १९८९ मध्ये स्थापन झालेली जागतिक संशोधन संस्था. ही संस्था या भव्य महासागरातील शार्कच्या संवर्धनासाठी काम करते. या संस्थेमुळे पर्यटकांना या व्हाइट शार्कचे आश्चर्यकारक जग जवळून अनुभवता येते. वास्तविक शार्क मासा हा मांसाहारी. माणूस त्याच्या तावडीत सापडला तर तो त्यालाही सोडणार नाही. त्यामुळे त्याच्या जवळ जाण्याचा विचारही करता येत नाही. मात्र, शार्क केज डायव्हिंगमुळे आपण सुरक्षित राहून शार्क जवळून बघू शकतो. जहाजाला बांधलेल्या एका पिंजऱ्यातून पर्यटकांना समुद्राच्या खोल पाण्यात सोडतात. एका दोरीला बांधून समुद्रात मांसाचे तुकडे फेकले जातात आणि त्या मांसाच्या वासाने शार्क पिंजऱ्याजवळ येतो तेव्हा समुद्राच्या त्या थंडगार पाण्यात श्वास रोखला जातो. अध्र्या तासाच्या त्या थरारक अनुभवानंतर भीती कुठल्या कुठे पळून जाते.
हिंदी महासागराचे शांत आणि रौद्र रूप एकाच वेळी अनुभवायचे असेल तर एकदा जलप्रवास करायलाच हवा. तोदेखील लहानशा क्रूझने. एकदा क्रूझवर स्वार झाल्यानंतर निळ्याशार समुद्राच्या हेलकावणाऱ्या लाटांवर स्वार होताना आनंद गगनात मावेनासा होतो. समुद्राच्या अवतीभोवती बांधलेले टुमदार बंगले, तिथल्या पहाडांवर बांधलेले बंगले आणि त्याच पहाडावरून धावणारी वाहने. हे सर्व अनुभवत असतानाच दरम्यान मध्येच कधी तरी समुद्र खवळणार असा इशारा येतो. त्यातून सावरण्याआधीच क्रूझ हेलकावे खाऊ लागते आणि पर्यटक अक्षरश: जीव मुठीत घेऊन बसतो. समुद्राच्या लाटा जहाजावर बसलेल्या पर्यटकांच्या अंगावर येऊन आदळतात आणि जहाज एका बाजूने झुकते, तेव्हा क्षणभरापूर्वी अनुभवत असणाऱ्या आनंदावर विरजण पडते आणि त्याची जागा भीतीने घेतलेली असते. शेवटी क्रूझच्या कॅप्टनला पर्यटकांच्या आग्रहास्तव क्रूझ मागे वळवावे लागते. या समुद्रात बऱ्याचदा ही स्थिती निर्माण होते. एक मात्र खरे की, क्रूझवर बसून सूर्यास्ताचे दिसणारे दृश्य कायमस्वरूपी मनात कोरले जाते. मावळतीला आलेल्या सूर्याचे क्षणाक्षणाला बदलणारे रूप आणि त्यानुसार समुद्राच्या पाण्याचे बदलणारे रंगदेखील पर्यटकांना येथेच अनुभवता येतात. तो प्रत्येक रंग, ते प्रत्येक दृश्य मग कॅमेऱ्यात कैद करण्याची चढाओढ पर्यटकांमध्ये लागते.
जोहान्सबर्गपासून उत्तरेला ४५ किलोमीटर अंतरावरची हॉट एअर बलूनची सफारी दुरून सुखद दिसत असली तरी प्रत्यक्षात अनुभवताना काही क्षण का होईना थरकाप उडतो. एका बलूनमध्ये अंदाजे १५-१६ पर्यटक असतात. सूर्योदयापूर्वी हा साहसी प्रकार सुरू होतो आणि तो हवेची दिशा आणि वेगाच्या भरवशावर अवलंबून असतो. हा अंदाज ज्याला घेता आला तोच उत्तम सारथी. अंदाज जराही चुकला तर या बलूनमधून अवकाशाची सफर करणाऱ्या पर्यटकांच्या जिवावरसुद्धा ते बेतू शकते. क्लब हाऊसमधून सफारीची सुरुवात होत असली तरी उतरण्याचे ठिकाण निश्चित नसते. हवा आणि वेग यावर ते अवलंबून असते. मग कधी कधी भरकटत गेलेल्या बलूनमध्ये असलेल्या पर्यटकांना जंगलातसुद्धा उतरावे लागते.
झिप लायनिंग हा साहसी प्रकारसुद्धा दक्षिण अफ्रिकेच्या जंगलात पर्यटक अनुभवू शकतात. कठीण प्रसंगात माणसाला देव आठवतो असे म्हणतात ना, तसेच काहीसे हा साहसी प्रकार अनुभवताना होते. अर्थातच पर्यटकांना तेवढीच सुरक्षा प्रदान केली जाते. तरीही हार्नेस बांधून एका टोकावरून दुसऱ्या टोकावर केवळ एका दोराच्या साहाय्याने मार्गक्रमण करताना मध्येच तो अडकला तर सगळे देव आठवतात. डोंगराचा माथा ते पायथा असे किमान दहा ते अकरा वेळा दोरीने इकडून तिकडे जावे लागते. अशा वेळी पर्यटकांना ‘टारझन’ न आठवला तर नवलच!
राखी चव्हाण – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा