अमेरिकेतील विस्कन्सिल-मेडिसिन युनिव्हर्सिटीचा निष्कर्ष
सोयाबीनपासून तयार करण्यात येणारे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी लाभदायक नव्हे तर मोठय़ा प्रमाणात हानीकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाळाला दुग्धजन्य पदार्थ देण्याऐवजी सोयाबीनपासून तयार करण्यात येणारा आहार अधिक प्रमाणात देण्यात येतो. त्यामुळे त्यांच्या रक्तात १३ ते २२ हजार पटीने ‘आईसोफ्लेवोन्स’ तयार होत असल्याचा निष्कर्ष अमेरिकेतील विस्कन्सिल-मेडिसिन युनिव्हर्सिटीच्या चमूने काढला आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रासोबतच आहारतज्ज्ञांमध्ये खळबळ उडाली आहे.
अमेरिकेतील विस्कन्सिल-मेडिसिन युनिव्हर्सिटीतील कारा वेस्टमार्क यांच्या नेतृत्वाखालील चमूने गाईचे दूध आणि सोयाबीनपासून तयार करण्यात आलेला आहार घेत असलेल्या दोन हजार बाळांवर सखोल अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. सोयाबीनपासून तयार केलेले पदार्थ सेवन केल्यास बाळाला स्वलीनता (ऑटिजम) सोबतच ताप येण्यास सुरुवात होते. प्राण्यांच्या दुधापेक्षा सोयाबीनचे दूध अधिक इंडोक्राईन असल्याने शरीराच्या वाढीची पद्धतच बदलत असते. सोयाबीनपासून तयार करण्यात येत असलेल्या अनेक पदार्थांमध्ये ‘इंडोक्राईन’ असते. प्राण्यांचे दूध घेणाऱ्या बाळांमध्ये १.६ टक्के तापाचे प्राण राहात असून सोयाबीनपासून दूध घेणाऱ्या बाळांमध्ये तेच प्रमाण ४.२ टक्के राहात असल्याचेही या निष्कर्षांत म्हटले आहे.
बाळरोग तज्ज्ञ बालकांना सोयाबीनयुक्त पदार्थ घेण्यास मनाई करीत असतानाही २५ टक्के सोयाबीनयुक्त पदार्थ दिले जातात. सोयाबीनयुक्त पदार्थ खाल्याने बालकांची प्रतिकारक्षमता, भौतिक परिपक्वता आणि बालकांच्या विकासाची गती मंदावते. त्यामुळे भविष्यात अभ्यासात ही मुले मागे पडतात. लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढीस लागते. सोयाबीनयुक्त पदार्थाच्या सेवनाचे संभाव्य धोके लक्षात घेऊन त्यात घटक पदार्थाचा नव्याने अभ्यास करावा तसेच त्यावर उपाययोजना आखाव्यात, असे स्पष्ट मत ‘कारा वेस्टमार्क’ यांनी आपल्या निष्कर्षांत व्यक्त केले आहे.
अकादमी ऑफ न्युट्रिशन इन्म्प्रुव्हमेंटचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल कोठारी यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले, सोयाबीनमध्ये टॉक्सीन, ट्रिप्सिन इनहिबीटर नावाचे विषारी घटक असतात. हे घटक पूर्णपणे काढूनच त्यापासून खाद्यपदार्थ तयार केले पाहिजे. तरच ते पदार्थ शरीराला लाभदायक ठरतात, परंतु बहुराष्ट्रीय कंपन्या तसे करीत नाहीत. सोयाबीनमधील हे विषारी घटक न काढता तयार केलेले पदार्थ पचनास जड जातात. तसेच आवश्यक प्रथिने निर्माण होत नाही. त्याचा परिणाम लहान मुलांच्याच नव्हे तर प्रौढांच्याही शरीरावर होतो. विषारीयुक्त सोयाबीन खाद्यपदार्थामुळे उच्च रक्तचाप होतो. हृदयरोगाचा झटका येण्याची शक्यता असते. मुत्रपिंड खराब होतात. कर्करोग होत असल्याचा निष्कर्षही नवीन संशोधनात काढण्यात आला आहे. जेवढे आजार वाढतील तेवढी औषधांची विक्री होईल. यासाठीच अमेरिकेने हे छडयंत्र रचले आहे. बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांचा यामागे हात असल्याचा आरोपही डॉ. कोठारी यांनी यानिमित्ताने केला.
सोयाबीनपासून तयार केलेले खाद्यपदार्थ हे कुपोषणावर अत्यंत लाभदायक असल्याचे केंद्र व राज्य सरकार सांगत आहेत. परंतु आपला त्याला स्पष्ट विरोध असल्याचे सांगून यासंदर्भात आपण केंद्र व राज्य सरकारच्या अन्न व औषध मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून सोयाबीनपासून तयार केलेले खाद्यपदार्थ किती धोकादायक आहेत, हे सांगत आहोत. परंतु त्याची दखल घेतली जात नसल्याबद्दल खंत वाटते. आपल्या मुलांची प्रकृती सुदृढ राहावी, असे वाटत असेल तर पालकांनी सोयाबीनपासून तयार केले पदार्थ देण्यापूर्वी त्यातील विषारी घटक काढण्यात आले काय, याची खात्री करून घ्यावी, असा सल्लाही डॉ. कोठारी यांनी दिला आहे.
आहारतज्ज्ञ प्रज्ञा बागलकोटे म्हणाल्या, सोयाबीनमध्ये काही घटक विषारी असतात. त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. सोयाबीनपासून तयार केलेले खाद्यपदार्थ विकत घेताना त्यातून ते घटक काढण्यात आले काय, याची चौकशी करूनच ते खरेदी करावे. तसेच सोयाबीनपासून खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांनी तसा उल्लेख करणे आवश्यक आहे. विषारी घटक काढल्यानंतर मात्र कोणतेही दुष्परिणाम होत नाही. उलट कोलेस्ट्रॉल संतुलित राहते. सोयाबीनचे पदार्थ खाल्यानंतर मळमळ वाटत असेल, अंग खाजवत असेल तर ते पदार्थ ताबडतोब बंद करावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा