धूम्रपान करणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या..धूम्रपान करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. मात्र त्याचा त्रास इतरांना अधिक होतो, हे धूम्रपान करणाऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. घरात धूम्रपान करणाऱ्या पालकांमुळे मुलांच्या आजारपणाला हातभार लागत असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.
धूम्रपानामुळे होणाऱ्या शिशूच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. धूम्रपानाचा जननक्षमतेवरही थेट परिणाम होत असल्याचे या संशोधनात मांडण्यात आले आहे. पत्नी गर्भवती असल्यास सिगारेट पिणाऱ्या पुरूषांच्या मुलांचे स्पर्म ५० टक्यांनी घटण्याची शक्यता आहे. लंडन विद्यापीठामध्ये करण्यात आलेल्या संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. १७ ते २० वर्ष वयोगटातील १०४ तरूणांवर संशोधन करण्यात आले. सिगारेट पिणाऱ्या व्यक्तीच्या मुलांचे स्पर्म इतरांच्या तुलनेत ५१ टक्क्यांनी कमी घटल्याचे या संशोधनात दिसून आले.
गर्भावस्थेवेळी महिलेने धुम्रपान केल्यास त्याचा वाईट परिणाम गर्भातील शिशूवर पडतो. शिवाय पत्नीच्या गर्भावस्थेवेळी पुरूषाने सिगारेट पिल्यास त्याचा नकारत्मक परिणाम होणाऱ्या शिशू पडत असल्याचे या संशोधनात समोर आल्याचे लंडन विद्यापीठातील जोनाथन एग्जल्सन यांनी सांगितले. ‘धूम्रपानामुळे व्यक्तीच्या वीर्यावर घातक परिणाम होतो. शुक्राणूनिर्मिती प्रक्रिया मंदावते, त्यामुळे त्याचा परिणाम जननक्षमतेवर होतो, असे आम्ही संशोधनाच्या निष्कर्षांत मांडल्याचे जोनाथन एग्जल्सन यांनी सांगितले.’
याआधी करण्यात आलेल्या संशोधनांनुसार धूम्रपान हे मुलांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्वसनासंबंधीचे विकार आणि अस्थमा यांसारखे विकार लहान मुलांना होण्याची शक्यता अधिक असल्याचे संशोधकांनी सांगितले. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्या घरातील मुलांना सातत्याने प्राथमिक उपचारांची गरज भासते. हा धोका लक्षात घेऊन पालकांनी धूम्रपान करणे टाळावे. अन्यथा मुलांना लहान वयात गंभीर आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही संशोधकांनी स्पष्ट केले.