इंटरनेट बँकींग वापरणे ही सध्या अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे. या माध्यमातून मोबाईल किंवा लॅपटॉपवर बँक खाते अगदी सहज हाताळता येते. तुम्हीही स्टेट बँक ऑफ इंडियाची इंटरनेट बँकींग सुविधा वापरत असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी लिंक केला नसेल तर तुम्हाला ही सुविधा वापरता येणार नाही असे बँकेने नुकतेच जाहीर केले आहे. ही घोषणा आता करण्यात आली असली तरीही येत्या १ डिसेंबरपासून हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आपला इंटरनेट बँकींगचा अॅक्सेस ब्लॉक होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही लवकर आपला मोबाईल क्रमांक बँक खात्याशी संलग्न करुन घ्या. अन्यथा १ डिसेंबरपासून तुमची इंटरनेट बँकींग सुविधा बंद होईल. हे टाळण्यासाठी तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेला भेट द्या.
तुमचा मोबाईल क्रमांक अकाऊंटला लिंक आहे की नाही असे तपासा…
१. http://www.onlinesbi.com या वेबसाईटवर क्लिक करा.
२. तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
३. लॉगइन झाल्यानंतर My Accounts and Profile वर क्लिक करा.
४. यातील Profile या पर्यायावर क्लिक करा.
५. यात Personal Details/ Mobile यावर क्लिक करा.
६. याठिकाणी तुम्हाला तुमचा प्रोफाईल पासवर्ड टाकावा लागेल. (हा पासवर्ड तुमच्या लॉगइन पासवर्डपेक्षा वेगळा असतो.)
७. यामध्ये तुम्हाला अकाऊंटशी लिंक केलेला तुमचा रजिस्टर केलेले नाव, मेल आयडी आणि मोबाईल नंबर दिसेल.
८. तुम्ही आधीच मोबाईल क्रमांक लिंक केला असेल तर तो तुम्हाला याठिकाणी दिसेल. अन्यथा तुम्हाला तो लिंक करण्यासाठी जवळच्या शाखेला भेट द्यावी लागेल.