अमेरिकी वैद्यकीय तज्ज्ञांचे संशोधन
आतडय़ामधील विशिष्ट प्रकारचे जिवाणू हे लठ्ठपणापासून संरक्षण करण्याबरोबरच कर्करोगाच्या संभाव्य धोक्यापासूनदेखील प्रतिबंध करीत असल्याचे नव संशोधनातून दिसून आले आहे.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हे जिवाणू आरोग्यास हितकारक असून कर्करोगाची व्याप्ती कमी करण्यासाठी किंवा ते रोखण्यासाठी ते उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.
एखाद्या व्यक्तीला कर्करोगाचे निदान झाल्यानंतर डॉक्टर आतडय़ामधील जिवाणूवरून त्याची तीव्रता आणि प्रकार याचे निदान करतो आणि त्यानंतरच विशिष्ट औषधांतून या जिवाणूंची संख्या वाढविण्यात येते. या जिवाणूंमध्येही उपुयक्त आणि घातक असे प्रकार आहे. उपयुक्त जिवाणू कर्करोग नियंत्रणासाठी उपयुक्त असतात, तर घातक जिवाणू आरोग्यास बाधक असतात, असे कॅलिफोर्निया विद्यापीठातील या संशोधक गटाचे प्रमुख रॉबर्ट स्केस्टल यांनी सांगितले.
स्केइस्टल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लॅक्टोबासिलुस जोहानसोनी ४५६ नामक जिवाणू उपयुक्त असल्याचे सांगितले. औषधांव्यतिरिक्त दह्य़ासारख्या पदार्थातून तो शरीराला मिळू शकतो, असेही या शास्त्रज्ञांनी सांगितले. मानसिक ताणावर उपयुक्त असलेल्या या जीवाणूची निर्मिती शरीरात होणे आवश्यक आहे.
कर्करोग, स्मृतिभ्रंश, हृदयासंबंधीचे आजार, त्वचेचा क्षयरोग यांसारख्या आजारांमुळे वाढणारा संभाव्य धोका आणि दाह कमी करण्यासाठी या जिवाणूवर संशोधन करण्यात येत असल्याचे रॉबर्ट स्केस्टल यांनी सांगितले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Story img Loader