Right Time For Eating Fruits : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी फळांचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही फळे खायला आवडतात. फळांमध्ये विविध प्रकारचे पोषक आणि अँटिऑक्सिडंट घटक असतात, जे अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात. आजारी असताना फक्त फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टरबुजाचा एक ताजा तुकडा खाण्यापासून ते जलद नाश्त्यासाठी मूठभर द्राक्षे खाण्यापर्यंत, फळे नेहमीच चांगला पर्याय आहे. जीवनसत्त्वे, फायबर आणि नैसर्गिक साखरेने भरलेली फळे शरीरासाठी पौष्टिक असतात. मात्र, कोणत्याही वेळी फळे खाणे हा योग्य पर्याय नसतो. कारण- चुकीच्या वेळी फळे खाल्ल्याने पचनाच्या अनेक समस्या उद्भवण्याचा धोका असतो. फळे किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी खावीत, याची अचूक माहिती असणेही महत्त्वाचे आहे.

दिवसातील ‘या’ वेळी फळे खाणे टाळा

दिवसातील काही विशिष्ट वेळा असतात, जेव्हा तुम्ही फळे खाणे टाळले पाहिजे. ‘त्या’ वेळी तुम्ही फळे खाऊ नयेत, असे प्रशिक्षक राधिका शाह यांचे मत आहे.

१. रिकाम्या पोटी- रिकाम्या पोटी फळे खाल्ल्याने तुमच्या शरीराला फायदा होईल, असे तुम्हाला वाटते का? पुन्हा विचार करा. तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या रक्तातील साखरेचे असंतुलन असेल, तर सकाळी फक्त फळे खाल्ल्याने उबळ येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला लवकरच थकवा येऊन भूक लागते. जर
तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल, तर असे करणे फायदेशीर नाही.

२. जेवणानंतर लगेच- आपल्यापैकी बरेच जण जेवणानंतर लगेच फळे खातात. अनेकांना असे वाटते की, त्यामुळे काही आराम मिळेल; पण, तसे होत नाही. का? कारण- प्रथिने आणि चरबीपेक्षा फळे लवकर पचतात. तज्ज्ञ म्हणतात की, जेवणानंतर फळे खाल्ल्याने आतड्यांमध्ये रासायनिक अभिक्रिया तयार होऊ शकते, ज्यामुळे अस्वस्थता आणि पोटफुगीचा त्रास संभवतो.

३. रात्री उशिरा- रात्री भूक लागली आहे का? मग अशा कोणत्याही परिस्थितीत फळे खाणे टाळा. शरीरस्वास्थ्य प्रशिक्षक सांगतात की, फळे रक्तातील साखर वाढवतात आणि झोपेच्या वेळी ती खाल्ल्याने तुमची झोप बिघडू शकते.

४. फळांचे डेझर्ट- जेवणानंतर फळांचे डेझर्ट खाल्ल्याने पचनशक्ती मंदावते. मग त्यामुळे गॅस आणि पोटफुगीचा त्रास होऊ शकतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते.

५. दुग्धजन्य पदार्थ- दुग्धजन्य पदार्थ आणि फळे एकत्र खाल्ली जात नाहीत. जेव्हा तुम्ही दुग्धजन्य पदार्थांसोबत तुमचे आवडते फळ खाता, तेव्हा ते पचनाच्या समस्या निर्माण करते. पोटफुगी आणि आतड्यांचे संतुलन बिघडण्याव्यतिरिक्त तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दुग्धजन्य पदार्थ आणि फळांचे मिश्रण त्वचेच्या समस्यादेखील निर्माण करू शकते.

फळे खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती

सकाळी किंवा संध्याकाळी ४ च्या सुमारास फळे खाण्याची सर्वोत्तम वेळ आहे.

ताजे फळे विरुद्ध फ्रोजन फळ : कोणते चांगले?

तुम्हाला फळे खाण्यासाठी सर्वांत चुकीची वेळ आणि योग्य वेळ कोणती हे माहीत झाले आहे. मग आता चला जाणून घेऊ की, ताजी फळे चांगली की गोठवलेली. शरीरस्वास्थ्य प्रशिक्षक राल्स्टन डिसोझा यांच्या मते, गोठवण्याची प्रक्रिया फळे आणि भाज्यांमधील पोषक घटकांचे नुकसान कमी होते. परंतु, बरेच दिवस शीत स्टोअरमध्ये ठेवलेले ताजे उत्पादन कालांतराने पोषक घटक गमावून बसते. म्हणून अन्नातील पोषक घटक टिकवून ठेवण्यासाठी गोठवणे ही एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे. त्याशिवाय गोठवलेली फळे आणि भाज्या सहसा अधिक सोईस्कर, स्वस्त आणि कदाचित अधिक पौष्टिक असतात.