बाजरातून आपण ताज्या भाज्या वा फळे घेऊन येत असतो. परंतु, या भाज्या घरी आणल्यानंतर ताज्या कशा राहतील याकडे आपण फारसे लक्ष देत नाही. विशेषतः स्वयंपाकात आपल्याला सतत कांदे आणि बटाटे लागत असतात. त्यामुळे या दोन्ही भाज्या आपण मोठ्या प्रमाणात घरी आणून ठेवतो. परंतु, बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन किंवा इतर काही कारणामुळे या भाज्या लवकर खराब होण्यास सुरुवात होते. एखादा बटाटा खराब झाला की, त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या इतर सर्व भाज्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो आणि त्या टोपलीमध्ये त्यासोबत ठेवलेल्या इतर सर्व भाज्याही खराब होऊ लागतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असे होऊ नये यासाठी मास्टरशेफ इंडियाच्या पहिल्या पर्वाच्या विजेत्या शेफ पंकज भदोरिया यांनी काही उपयुक्त टिप्स आपल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करून दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी भाज्या योग्य प्रकारे कशा साठवून ठेवाव्यात याबद्दल उपयुक्त अशी माहिती दिली आहे. ती काय आहे ते पाहा.

हेही वाचा : भांडी आवडली म्हणून उगाच पैसे खर्च करू नका; स्वयंपाक घरातील वस्तू घेण्याआधी ‘या’ पाच टिप्स पाहा

कांदे-बटाटे जास्त काळ चांगले ठेवण्यासाठी पाहा हे करून…

१. भाज्या वेगवेगळ्या ठेवा

सर्वसामान्यपणे आपण कांदे आणि बटाटे बाजारातून आणल्यानंतर ते एकाच टोपलीमध्ये ठेवतो आणि हेच या दोन भाज्या पटकन खराब होण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. पंकज यांच्या म्हणण्यानुसार- बटाट्यांमधून एक विशिष्ट प्रकारचा गॅस बाहेर पडत असतो. अशा वेळेस कांदेही बटाट्यांसोबत असतील, तर ते लवकरात लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दोन्ही भाज्या वेगवेगळ्या ठेवणे गरजेचे असते.

२. टोपल्यांची निवड

सहसा भाज्यांसाठी प्रत्येकाच्या घरात डबे, ट्रे किंवा टोपली ठेवलेली असते. बाजारात जाऊन जर भाजी आणली, तर कधी कधी ती घरी आल्यानंतर पिशव्यांमध्ये राहते. किंवा जर भाज्या ऑनलाइन मागवल्या असतील, तर भाज्यांसोबत त्याच्या कागदी पिशव्यादेखील येतात. अशा वेळेस आपण थोडा आळस करतो आणि आलेल्या सर्व भाज्या त्याच कागदी पिशव्यांमध्ये ठेवून देतो. तर काही जण सरसकट सर्व गोष्टी फ्रिजमध्ये ठेवून देतात. या लहान चुकांमुळेसुद्धा कांदे-बटाटे खराब होऊ शकतात.
त्यामुळे कांदे-बटाटे ठेवण्यासाठी हवा खेळती राहील अशा जाळीदार टोपल्यांची निवड करावी.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या @masterchefpankajbhadouria या अकाउंटवरून शेफ पंकज यांनी या सोप्या; पण उपयुक्त अशा टिप्सचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला सुमारे सहा लाख ३८ हजार इतके व्ह्युज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop storing onions and potatoes together use this tips and tricks to keep them fresh check it out dha