डोळ्यातून माणसाच्या भावना चेहऱ्यापेक्षाही जास्त प्रभावीपणे व्यक्त होत असतात हे तर खरेच, पण त्यातून माणसाला आलेल्या ताणाचे मोजमापही शक्य असते, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. मानसिक ताण हा शरीरावर सर्वच पातळ्यांवर परिणाम करून रोगांना कारण ठरत असतो. आजच्या बहुकौशल्य कामांच्या जगात एक व्यक्ती एका वेळी अनेक कामे करीत असते, त्यामुळे तिच्या मेंदूवर ताण येतो, पण तो ओळखण्यासाठी आता डोळे हे एक साधन आहे. डोळ्याच्या बाहुलीच्या विशिष्ट स्थिती व तिच्या हालचालींवरून हा ताण ओळखतात.
आजच्या काळात समाजात लोकांवर कामाचा ताण वाढत आहे, याबाबत आधीही बराच अभ्यास झाला असून उत्पादनशीलता वाढवण्याच्या नादात लोकांना कमी वेळात अतिशय वेगाने जास्त काम करावे लागते. पण यात मानसिक ताणाकडे दुर्लक्ष होते. अमेरिकेतील मिसुरी- कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक जुंग हायप किम यांनी सांगितले की, मानसिक ताणाचा परिणाम डोळ्यातून दिसत असतो. मल्टिटास्किंग करणाऱ्या लोकांचा ताण मोजण्याची कोणतीच पद्धती सध्या नाही, पण डोळ्याच्या बाहुलीचा आकार हा ताणनिदर्शक असतो. वेगवेगळ्या व्यवसायांत काम करणाऱ्या व्यक्तींच्या डोळ्यांचा अभ्यास करून यात काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत. वेगवेगळी अनपेक्षित कामे करताना डोळ्यात वेगवेगळे बदल होतात, त्यात नासाचे अवकाशवीर, तेलशोधन व्यवसायातील कर्मचारी अशा अनेकांच्या डोळ्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित कामाचे परिमाण व इतर गोष्टी ठरवणे शक्य होणार आहे.