तेजश्री गायकवाड – response.lokprabha@expressindia.com
उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून खाण्यापिण्याच्या बाबतीत जशी काळजी घेतली जाते, तशीच कपडय़ांच्या बाबतीतही घ्यायला हवी. म्हणजे आरोग्यही सांभाळले जाईल आणि लुकही मिळेल.
एप्रिल महिन्यामध्ये उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. वाढत्या उष्म्यापासून वाचण्यासाठी जे वेगवेगळे उपाय अवलंबले जातात, त्यात एक उपाय म्हणजे कपडे. उन्हाळ्यात कोणतेही कपडे घातले आणि निघालो असं केलं तर जास्त त्रास होतो. त्यामुळे या काळात कपडय़ांच्या कलेक्शनमध्ये बदल करणं गरजेचं आहे. योग्य कपडय़ाची निवड केली तर तुम्ही उन्हाळ्यातही ‘कुल’ राहू आणि दिसू शकता.
प्रिंट्स :
उभ्या स्ट्राइप्स (Vertical Stripes)
मेन्स फॅशनमध्ये स्ट्राइप्सला वर्षांनुवर्षे भलतेच महत्त्व आहे. त्यामुळे स्ट्राइप्सची फॅशन कधी आऊट ऑफ जात नाही. यंदाही समर लुकमध्ये उभ्या स्ट्राइप्सचा बोलबाला असणार आहे. उभ्या स्ट्राइप्समध्येही वेगवगळे प्रकार असतात. आकाराने मोठी स्ट्राइप्स, लहान स्ट्राइप्स, सिंगल स्ट्राइप्स, डबल स्ट्राइप्स असे अनेक प्रकारांची फॅशन तुम्हाला सहज बघायला मिळेल. उभी स्ट्राइप्स असलेली प्रिंट फॉर्मल शर्ट, ब्लेझरपासून ते वेगवेगळ्या जॅकेट्स मध्येही ट्रेण्डिंग आहे. अगदी टी-शर्टमध्येही तुम्हाला या स्ट्राइप्सचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील. त्यामुळे यंदाच्या समर लुकसाठी तुमच्या कपाटामध्ये उभ्या स्ट्राइप्सची प्रिंट असलेले कपडे नक्कीच असायला हवेत.
बोल्ड आणि फ्लोलर प्रिंट
मेन्स फॅशनमध्ये चेक्स प्रिंट, स्ट्राइप्स अशा काही मोजक्या प्रिंट्स सोडल्या तर जास्त काही नसतं अशी समजूत आहे. आणि त्यातच मेन्स फॅशनमध्ये बोल्ड आणि फ्लोलर प्रिंटला काही वर्षांपासूनच महत्त्व आलं आहे. मेन्स समर लुकमध्ये लाइट रंगाच्या फ्लोरल प्रिंट्सची चलती असणार आहे. या प्रिंट्सचा आकार लहान ते मोठा असा सगळ्या आकारात तुम्हाला बाजारात उपलब्ध होईल. फ्लोरल प्रिंट्स जास्तीत जास्त शर्टवरतीच ट्रेंिडग आहेत. याव्यतिरिक्त अॅबस्ट्रॅक्ट प्रिंट, बोल्ड पोलका डॉट प्रिंट अशा प्रिंट्सही ट्रेण्डिंग असणार आहेत. त्यामुळे यंदा बिनधास्त अशा प्रिंट्सचे टी-शर्ट आणि शर्ट तुम्ही वापरू शकता.
रंग :
उन्हाळ्यात वापरल्या जाणाऱ्या कपडय़ांच्या रंगामुळे आपल्या समर लुकमध्ये खूप फरक पडतो. त्यासाठी कपडय़ांच्या ट्रेण्डिंग रंगासोबत योग्य रंगाची निवड केली तर आपल्या शरीरालाही उन्हाचा, गर्मीचा त्रास होत नाही. या वर्षी समर लुकमध्ये टोनल (tonal) रंग ट्रेण्डिंग आहेत. टोनल रंग म्हणजे सेम रंगाच्या ग्रुपमधल्या शेड.
लॅव्हेंडर :
समर लुकमध्ये लॅव्हेंडर हा रंग सगळ्यात जास्त बघायला मिळणार आहे. रोमॅन्टिक आणि ऐलिगंट असा हा रंग कोणत्याही प्रकारच्या कपडय़ामध्ये सूट करेल.
पर्पल
अल्ट्रा वॉयलेट रंग हा कलर ऑफ द एअर आहे. आणि पर्पल ही याचीच एक शेड आहे. या रंगाची लाइट शेड उन्हाळ्यात डोळ्यांना थंडावा देते. त्यामुळे या समर लुकमध्ये तुमच्याकडे या रंगाचे कपडे असणं नक्कीच गरजेचं आहे.
रॅप्चर (Rapture) रोझ
साधारणत: पिंक कलरच्या शेडमध्ये असणारा हा रंगही उन्हाळ्यात डोळ्यांना थंडावा देतो. उन्हाळ्यातल्या घामामध्ये फ्रेशनेसची गरज असते आणि याचंच काम हा रंग करतो.
फिक्कट निळा
निळा रंग नेहमीच फ्रेश वाटतो. फिक्कट निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या शेड असतात. हा रंग मेन्स फॅशनमध्ये नेहमीच ट्रेण्डिंग असतो.
मिल्क व्हाइट
उन्हाळा म्हटलं की पांढरा रंग आलाच. या पांढऱ्या रंगाच्याही शेड असतात. यामध्येही तुम्ही नीट बघितलं तर डार्क टू लाइट अशा शेड तुम्हाला दिसतील. यामधील मिल्क व्हाइट ही शेड यंदा ट्रेण्डिंग आहे.
बॉट्टमस :
उन्हाळा म्हटलं की रोजच्या वापरातील जीन्स अजिबात वापराविशी वाटत नाही. आणि रेग्युलर ट्राऊजरलाही काही पर्याय असावा असं वाटतं. नाही तर आपल्या लुकमध्ये तोचतोपणा येतो.
साइड स्ट्राइप ट्राउजर
साइड स्ट्राइप ट्राऊजर म्हणजे सर्वसामान्यांच्या मते ट्रॅक पॅण्ट्स. पण साधारणत: ट्रॅक पॅण्ट्स सारखीच दिसणारी साइड स्ट्राइप ट्राऊजर यंदाच्या अनेक फॅशन डिजायनरच्या समर कलेक्शनमध्ये बघायला मिळाली. या साइड स्ट्राइप ट्राऊजरवर तुम्ही अगदी शर्टपासून ते टी-शर्ट, जॅकेट्सपर्यंत सगळं घालू शकता. स्लिम फिट शर्ट आणि साइड स्ट्राइप ट्राऊजर, प्लेन टी-शर्ट त्यावर ओवर साइझ जॅकेट आणि त्याखाली डार्क रंगाची साइड स्ट्राइप ट्राऊजर नक्की ट्राय करून बघा.
डेड डेनिम / रिप्ड (Ripped) लाइट डेनिम जीन्स
रोजच्या वापरातील पायाला घट्ट चिकटून बसणारी जीन्स उन्हाळ्यात नकोच असते. पण आपण १२ महिने ही जीन्स वापरतोच. त्यामुळे उन्हाळ्यातही कितीही त्रास झाला तरी बरेच लोक जीन्स घालतात. हेच हेरून डेड डेनिम किंवा रिप्ड (Ripped) लाइट डेनिम जीन्स बाजारात आल्या आहेत. लेग फ्रेंडली अशा या जीन्स तुम्हाला कडक उन्हाळ्यातही वापरता येतील. या जीन्स लुज फिटिंग असणाऱ्या, वॉशिंगसाठी सोप्या आणि महत्त्वाचं म्हणजे सहज घालता आणि काढता येणाऱ्या अशा आहेत. अशा जीन्सवरती तुम्ही प्रिंटेड टी-शर्ट, लुझ फिटिंग शर्ट, पेस्टल रंगाचे शर्ट, चेक्स शर्ट घालू शकता.
लॉगर शॉर्ट्स
उन्हाळा म्हटलं की बॉट्टमसमध्ये शॉट्स आल्याच. नेहमीप्रमाणे गुडघ्याच्या वर किंवा गुडघ्याच्या खाली असणाऱ्या यंदा शॉर्ट्सच्या उंचीमध्ये बदल झाला आहे. अनेक फॅशन डिझायनरच्या कलेक्शनमध्ये ही उंची गुडघ्याच्या अगदी बरोबर मध्येपर्यंत आहे. या शॉर्ट्सवर लाइट रंगाचे शर्ट, प्रिंटेड टी-शर्ट, त्यावर जॅकेट्स घालू शकता. शॉर्ट्सच्या रंगानुसार योग्य तो टी-शर्ट किंवा शर्ट निवडला तर तुमचा समर लुक तयार.
ट्राउजर
ट्राऊजरमध्ये लाइट रंगाच्या लिनन फॅब्रिकच्या ट्राऊजर उन्हाळ्यात वापरायला हव्यात. सुटसुटीत असणाऱ्या या ट्राऊजर पायाला चिकटून बसत नाहीत आणि आपला घामही शोषून घेतात. याची पेअर जास्तीत जास्त फॉर्मल आणि सेमी फॉर्मल शर्टसोबत जास्त छान दिसते आणि ही फॅशन ट्रेण्डिंगही आहे. यासोबत पांढऱ्या रंगाच्या चिनोजही (chinos) दरवर्षीप्रमाणे इन ट्रेण्ड आहेत. क्लीन-फिट, लाइट वेट आणि कम्फर्टेबल लुक असणाऱ्या या चिनोजची पेअर तुम्ही टी-शर्ट किंवा शर्टसोबत करू शकता. ट्राऊजरमध्ये छोटय़ा प्लीट्स असणाऱ्या ट्राऊजर नव्याने बाजारात आल्या आहेत. या ट्राऊजर म्हणजे हाय स्ट्रीट फॅशनचा उत्तम नमुना आहे. यावरती फिटेड टी-शर्ट आणि ट्रेंडिंग बोल्ड बेल्ट घालून बघा. बेस्ट हाय स्ट्रीट फॅशन समर लुक तुम्हाला सहज मिळेल.
फुटवेअर :
मेन्स फॅशनमधील अतिमहत्त्वाचा भाग म्हणजे फुटवेअर. तुम्ही अप्पर आणि लोअर गारमेंट कितीही योग्यरीत्या घालत असेल तरी चुकीच्या फुटवेअरमुळे तुमचा संपूर्ण लुक बिघडू शकतो. त्यामुळे योग्य फुटवेअरची निवड गरजेची आहेच.
लोफर्स (loafers)
समर सीजनमध्ये मेन्स लोफर्स हा एक उत्तम पर्याय मानला जातो. यामध्ये पायाला आराम मिळतो आणि त्यामुळेच अनेकांची याला पसंती मिळते. हे लोफर्स तुम्ही कोणत्याही प्रकारच्या लुकवरती कॅरी करू शकता. निळ्या, पांढऱ्या, राखाडी, काळ्या अशा अनेक रंगामध्ये हे बाजारात सहज उपलब्ध आहेत.
स्निकर्स
वर्षभर इन ट्रेण्ड असणाऱ्या स्निकर्समध्येही अनेक प्रकार आहेत. यंदा स्निकर्समध्ये तुम्हाला पेस्टल रंगाच्या शेड बघायला मिळतील. लाइट, फ्रेश अशा या शेड कडक उन्हातही पायाला आणि डोळ्यालाही थंडावा देतील. पांढऱ्या रंगाचे कॅनव्हास स्निकर्सही या वर्षी ट्रेण्डिंग आहेत आणि हे फुटवेअर कोणत्याही पद्धतीच्या लुकवरती शोभून दिसतात. या फुटवेअरमुळे कोणताही लूक कधीही फसत नाही. त्यामुळे समर लुकसाठी याचा बिनधास्त वापर करा.
सेलिब्रिटी समर लुक
काही वर्षांपूर्वी आलेला अक्षय कुमारचा ‘हॉलिडे’ हा सिनेमा आठवतोय का? या सिनेमामध्ये अनेक सीन्समध्ये अक्षय कुमार समर लुकमध्ये दिसला. त्याचा ‘तूही तो है खयाल मेरा’ या गाण्यातील समर लूक तुम्हालाही हवाय? त्यासाठी या काही टिप्स.
- अप्पर गारमेंटमध्ये तुम्ही प्लेन सेमी फिट्टेड शर्ट किंवा प्लेन रंगाचा टी-शर्ट घालू शकता.
- त्याखाली लोअर गारमेंटमध्ये फ्रेश, लाइट, पेस्टल रंगाची शेड असणारी शॉट्स.
- फुटवेअरमध्ये तुम्ही अप्पर आणि लोअर गारमेंटच्या रंगाच्या हिशेबाने कोणत्याही लाइट रंगाचे स्निकर्स घाला. रंगसंगती समजली नाही तर सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे पांढऱ्या रंगाचे स्निकर्स घाला.