उन्हाळा सुरू झाला आहे. परीक्षा संपत आल्या आहेत आणि त्याबरोबर आता उन्हाळी शिबिरे, सहली, छंदवर्ग यांची आखणी सुरू झाली आहे. सुट्टीच्या या योजनांमध्ये घरातील माणसांबरोबरच आता ‘श्वानुले’ही सामावले आहेत. श्वानांना होणारी उन्हाची तलखी कमी करण्यासाठी बाजारात वेगवेगळी उत्पादने दाखल झाली आहेतच, त्याचबरोबर आता पोहण्याचे तलावही सज्ज झाले आहेत. प्राणी आणि त्यांच्या पालकांसाठी एकत्रित उन्हाळी शिबिरे, सहली, पूल पार्टी याबरोबरच पुण्यात श्वान आणि त्यांच्या पालकांसाठी होळीही साजरी करण्यात आली. श्वान पालन सुखावह करण्यासाठी सरसावलेले विविध सेवा पुरवठादार रोज नव्या कल्पना घेऊन समोर येत आहेत आणि श्वान पालकांनाही त्याची भूरळ पडत आहे.
पोहण्याच्या तलावांवर गर्दी
शहराच्या भोवताली उपनगरांमध्ये श्वानांसाठीचे पोहण्याचे तलाव मोठय़ा प्रमाणावर उभे राहिले आहेत. डॉग रिसॉर्टमध्ये श्वानांसाठी पोहण्याचा तलाव असणे ही सुविधा आता गृहितच धरण्यात येऊ लागली आहे. फक्त श्वानांसाठी किंवा श्वान आणि त्यांच्या पालकांना एकत्रित पोहण्याची, पाण्यात खेळण्याची सुविधा या तलावांवर मिळते. पुणे आणि परिसराचा विचार करायचा झाल्यास साधारण १० ते १५ तलाव आहेत. त्याचप्रमाणे येत्या महिन्यात नव्याने काही सुरू होत आहेत. पोहण्याचे कौशल्य निसर्गत:च श्वानांच्या अंगी असते. अनेक श्वानांना पोहणे आवडते देखील. या तलावांवर श्वानांसाठी वेगवेगळे खेळही आखण्यात येतात. पालक आणि श्वानांना एकत्रितपणे पोहता येईल किंवा पाण्यात खेळता येईल असे तलावही अनेक आहेत. पाण्यात मनसोक्त खेळून झाल्यानंतर श्वानाला व्यवस्थित कोरडे करून, केस विंचरून पालकांच्या ताब्यात दिले जाते. मोठय़ा जागेच्या शोधात शहराच्या मुख्य भागापासून हे तलाव दूर असले तरी अधिकचे शुल्क आकारून जाण्या-येण्याची सुविधाही केली जाते. लहान पिलांसाठी किंवा पहिल्यांदाच पाण्यात जाणाऱ्या श्वानांना पोहण्याची गोडी लागावी यासाठी प्रशिक्षक मदत करतात. तीन तासांसाठी साधारण पाचशे रुपयांपासून शुल्क आकारले जाते. प्राण्यांबरोबर नौकाविहार करण्यासाठीही काही तलाव उभे राहात आहेत.
पूल पार्टी आणि होळी
सगळीकडे होळी उत्साहाने साजरी होत असताना घरातील श्वानही त्यापासून वेगळे राहिलेले नाहीत. श्वानांसाठी आयोजित करण्यात आलेली ‘रंगविरहित होळी पार्टी’पुण्यात नुकतीच रंगली. त्याचबरोबर उन्हाळ्यात अनेक क्लब्स आणि रिसॉर्टसाठी ‘श्वान आणि पालकांसाठी एकत्र ‘पूल पार्टी’, ‘रेन डान्स’चे आयोजन केले आहे. पेपी पॉज या रिसॉर्टचे राशी पौडवाल यांनी सांगितले, ‘एखादा अपवाद वगळला तर कोणत्याही प्रजातीचे श्वान असले तरीही त्याला पोहायला किंवा पाण्यात खेळायला आवडते. त्यात उन्हाळ्यात पाण्यात खेळून त्यांनाही बरे वाटते. त्यासाठी ‘होळी पार्टी’ आयोजित केली होती. श्वान लहान असेल, तर ते पाण्याला घाबरू शकते. त्यामुळे त्याला पाण्याची ओळख करून देताना काही काळजी घ्यावी लागते. मात्र एकदा पाणी आवडले तर पुन्हा श्वानाला घरी जायचे नसते इतके ते पाण्यात खेळण्यात रमतात.’
उन्हाळी शिबिरे
सुट्टीत दूरच्या सहलीला जाताना प्रत्येक वेळी घरातील श्वानाला बरोबर नेता येत नाही. अशांसाठी ही उन्हाळी शिबिरे दिलासादायक ठरत आहेत. समुद्र किनारे, रिसॉर्ट, अॅग्रो फार्म अशा ठिकाणी ही शिबिरे आयोजित करण्यात येतात. सध्या पुणे आणि मुंबईमध्ये सहा ते सात व्यावसायिक अशी शिबिरे आयोजित करतात. साधारण २ हजार रुपयांपासून या शिबिरांसाठीच्या शुल्काची सुरुवात होते. वेगवेगळे खेळ, स्पर्धा या शिबिरांमध्ये आयोजित करण्यात येतात. ‘प्राणी आणि त्याच्या पालकांना घरापासून दूर, रोजच्या दिनक्रमापेक्षा वेगळ्या वातावरणात एकत्रितपणे वेळ घालवता यावा,’ अशी मूलभूत संकल्पना घेऊन या शिबिरांची सुरुवात झाली. श्वानपालकांसाठी मार्गदर्शन करणारे वर्गही या शिबिरात असतात. प्राणी पालकत्वाच्या या मेळाव्याला गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद वाढत आहे. याबाबत ‘क्रेझी के ९ कॅम्पर्स’च्या पूजा साठे-गावंडे यांनी सांगितले, ‘एप्रिल आणि मे मध्ये उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. श्वानांनाही त्यांच्या दिनक्रमातून विरंगुळा मिळणे गरजेचे असते. त्यात अगदी छोटय़ा सहलीला जायचे झाले तरी श्वानाला दूर ठेवून जाणे अनेकांना आवडत नाही. त्यांच्यासाठी या शिबिरांची सुरुवात केली. या निमित्ताने वेगवेगळी प्राणीप्रेमी कुटुंबे एकत्र येतात. त्यांच्यातही देवाण-घेवाण होते आणि विरंगुळाही मिळतो.’