Summer skin care tips : वातावरण बदलले की त्याचा परिणाम तुमच्या केसांवर, त्वचेवर लगेच दिसू लागतो. म्हणजे हिवाळा आला की ताबडतोब आपली त्वचा कोरडी आणि शुष्क होते, तर केसांमध्ये भयंकर कोंडा होतो. परंतु, उन्हाळ्यात त्वचा तेलकट होणे, काळवंडणे, टॅन होणे अशा कितीतरी समस्यांचा आपल्या चेहऱ्याला सामना करावा लागतो. मात्र, सर्व समस्यांवर समाधान हे असतेच. तसेच उन्हाळ्यात चेहऱ्याची टॅनिंगपासून काळजी कशी घ्यायची, त्यासाठी काय करायचे हे आपण पाहणार आहोत.
हिवाळा असो वा उन्हाळा आपल्या त्वचेसंबंधी कोणत्याही समस्येवर मदत करण्यासाठी कोरफड कायम तयार असते. उन्हाळ्यात त्वचेवरील तेलकटपणा, पुरळ, पिंपल्स, धूळ-मातीने होणारे त्रास आणि टॅनिंगचा सर्वात मोठा त्रास कोरफडीमुळे सहज दूर केला जाऊ शकतो. प्रखर आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे अगदी काही वेळातच त्वचा काळवंडते. तुम्ही कितीही सनस्क्रीन लावले तरीही त्याचा हवा तेवढा उपयोग होत नाही. अशात कोरफडीमध्ये असणारे औषधी गुणधर्म आणि अँटी ऑक्सिडंट्स, अँटी इंफ्लेमेट्री घटक, खनिजे इत्यादी गोष्टी तुमच्या त्वचेची काळजी घेतात. त्यासाठी कोरफडीपासून घरीच ‘डी-टॅनिंग’ फेसपॅक कसा बनवायचा ते पाहू.
घरगुती डी-टॅनिंग [De-tanning] फेसपॅक कसा बनवायचा?
साहित्य
कोरफडीचा ताजा गर
लिंबाचा रस
मध
दही किंवा काकडीचा रस [हवे असल्यास]
फेसपॅक तयार करण्याची कृती
सर्वप्रथम कोरफडीच्या एका पानामधून सुरी किंवा चमच्याच्या मदतीने सर्व गर व्यवस्थित एका बाऊलमध्ये काढून घ्या.
यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मध घालून घ्या.
हवे असल्यास या मिश्रणात एक चमचा दही अथवा काकडीचा रस घालून सर्व मिश्रण चमच्याच्या साहाय्याने छान एकजीव करून घ्या.
हेही वाचा : Skin care : केवळ पूजेसाठी नव्हे, तर त्वचेसाठीही करा तुळशीचा वापर! पाहा या पाच टिप्स
डी-टॅनिंग फेसपॅक कसा लावावा?
चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा किंवा एखादे चांगले क्लिन्झर घेऊन कापसाच्या मदतीने चेहरा स्वच्छ करून घ्या.
तयार केलेला फेसपॅक बोटांच्या किंवा ब्रशच्या साहाय्याने संपूर्ण चेहऱ्यावर एकसमान लावावा.
फेसपॅक लावताना डोळ्यांजवळील भाग टाळावा.
हा मास्क चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी लावून ठेवावा.
या वेळात त्वचा फेसपॅकमधील सर्व घटक शोषून घेण्याचे काम करेल.
चेहऱ्यावरील पॅक कोमट पाण्याने १५ ते २० मिनिटांनी धुवून टाका. चेहरा मऊ टॉवेलच्या मदतीने टिपून घ्या.
सर्वात शेवटी चेहऱ्यावर तुमच्या आवडीचे मॉइश्चरायझर लावून घ्या.
या घरगुती फेसपॅकचा वापर तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळा करू शकता, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून समजते.
हेही वाचा : Hair care : अरे बापरे! लहान वयातच केस पांढरे? पाहा ‘या’ घरगुती गोष्टी करतील तुमची मदत
फायदे
कोरफड – कोरफडीमध्ये विविध जीवनसत्त्वे, अँटी ऑक्सिडंट्स, अँटी इंफ्लेमेट्री, खनिजे असे घटक असतात. तसेच यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. या सर्व घटकांमुळे त्वचा उजळते. त्वचेला थंडावा मिळण्यास मदत होते. तसेच त्वचेवर तुकतुकी येते, तजेला येतो, त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.
लिंबू – लिंबामध्ये असणारे घटक चेहऱ्यावरील काळे डाग, हायपर पिगमेंटेशन इत्यादी गोष्टींसाठी दूर करण्यास उपयुक्त असतात.
मध – त्वचेला मऊ आणि हायड्रेट करण्याचे काम मध करत असते.
दही किंवा काकडीचा रस – काकडी आणि दही हे दोन्ही घटक त्वचेला शांत आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.
[टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असल्याने, कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये.]