Summer Waxing Tips For Hair Removal : वाढदिवस, लग्न किंवा एखादा खास दिवस आपण सगळ्यात पहिला आयब्रो आणि हाता-पायाचे वॅक्सिंग करून घेतो. त्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करतो. पण, काही वेळा वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेचे नुकसान होते. हातावर पुरळ किंवा पॅच येतात, तर काही लोकांना याची ॲलर्जी होते.
उन्हाळ्यात प्रचंड घाम येत असल्यामुळे अनेक जण वॅक्सिंग करण्यावर भर देतात. कारण- उन्हाळ्यात आपण शरीराच्या स्वच्छतेसह सौंदर्याकडे अधिक लक्ष देतो. पण, उन्हाळ्यात वॅक्सिंग करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे; अन्यथा, त्वचेवर पुरळ, जळजळ किंवा संसर्गाची समस्या उद्भवू शकते.
जर तुम्हीही उन्हाळ्यात वॅक्सिंग करण्याचा विचार करीत असाल, तर तर पुढील महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या… (Summer Waxing Tips)
वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करा (Clean Skin Before Waxing)
वॅक्सिंग करण्यापूर्वी तुमची त्वचा स्वच्छ आहे का बघा. जर त्वचेवर धूळ, घाम किंवा कोणतेही लोशन असेल, तर वॅक्सिंग व्यवस्थित होणार नाही आणि पुरळ किंवा जळजळ होऊ शकते. त्यासाठी सौम्य फेस वॉश किंवा स्क्रबने त्वचा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा.
त्वचेला एक्सफोलिएट करायला विसरू नका (Do Not Forget To Exfoliate Skin)
वॅक्सिंगच्या एक दिवस आधी तुमची त्वचा एक्सफोलिएट करायला विसरू नका. त्यामुळे मृत त्वचा निघून जाते, केसांचे कूप स्वच्छ होतात, ज्यामुळे वॅक्सिंग प्रक्रिया सुरळीत होते आणि वेदना देखील कमी होतात.
वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचेला मॉइश्चरायझर लावू नका (Do Not Moisturise Skin Before Waxing)
उन्हाळ्यात त्वचा कोरडी होते. पण, वॅक्सिंग करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे मॉइश्चरायझर किंवा तेल लावू नका. त्यामुळे वॅक्स त्वचेला व्यवस्थित चिकटणार नाही आणि केस व्यवस्थित काढता येणार नाहीत.
वॅक्सिंग केल्यानंतर उन्हात जाणे टाळा (Avoid Sun After Waxing)
वॅक्सिंग केल्यानंतर लगेच उन्हात जाणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्वचेवर जळजळ, सनबर्न किंवा काळे डाग येऊ शकतात. कमीत कमी २४ तास सूर्यप्रकाशात जाणे टाळा आणि त्वचा शक्य तितकी झाकून ठेवा.
वॅक्सिंग केल्यानंतर घट्ट कपडे घालू नका (Do Not Wear Tight Clothes After Waxing)
वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा खूप संवेदनशील होते आणि घट्ट कपडे घातल्याने त्वचेचे घर्षण किंवा त्यावर लालसरपणा किंवा पुरळ येऊ शकतात. त्यामुळे हलके, सुती, सैल कपडे घालणे तुमच्यासाठी चांगले ठरेल.
वॅक्सिंग केल्यानंतर कोल्ड कॉम्प्रेस लावा (Apply Cold Compress After Waxing )
वॅक्सिंग केल्यानंतर जर तुम्हाला त्वचेवर जळजळ जाणवत असेल, तर त्यावर बर्फ हळुवारपणे कॉम्प्रेस करा. त्यामुळे त्वचेला आराम मिळेल आणि सूजदेखील थांबेल.
तुमच्या त्वचेला घामापासून वाचवा (Protect Your Skin From Sweat)
उन्हाळ्यात, वॅक्सिंग केल्यानंतर घामामुळे त्वचेवर जळजळ आणि संसर्ग होऊ शकतो. वॅक्सिंग केल्यानंतर लगेच जिम, योगा किंवा कोणतीही जड शारीरिक हालचाल टाळा.