अधिकृतपणे लॉंच होण्यापूर्वीच ‘ओला इलेक्ट्रिक स्कूटर’ ही मोठी लोकप्रियता मिळवत आहे. या स्कूटरच्या फिचर्सबद्दल सध्या सर्वांच्याच मनात आता मोठी उत्सुकता आहे. याची प्रचिती या स्कूटरच्या प्री- बुकिंगच्या पहिल्याच दिवशी आली आहे. तर, ओलाचे चेअरमन आणि ग्रुप सीईओ भविश अग्रवाल यांनी बहुप्रतिक्षित ‘ओला इलेक्ट्रिक स्कूटर’ ही येत्या १५ ऑगस्ट रोजी लॉंच होणार असल्याची जाहीर घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट रोजी आणखी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होत आहे. सिंपल वन असं या इलेक्ट्रिक स्कूटरचं नाव आहे. तर आज आपण एकाच दिवशी लॉंच होणाऱ्या ‘ओला इलेक्ट्रिक स्कूटर’ आणि ‘सिंपल वन’ या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरर्सच्या फीचर्सबाबत उपलब्ध माहिती जाणून घेऊया

पहिल्याच दिवशीओला इलेक्ट्रिक स्कूटरची लाख प्रीबुकिंग्स पूर्ण

आपल्या माहितीसाठी, नवीन ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग आधीच सुरू झाली आहे. ४९९ रुपयांच्या टोकन रक्कम भरून ही स्कूटर प्री-बुक केली जाऊ शकते. कंपनीने याबाबत असंही स्पष्ट केलं आहे की, बुकिंग रद्द झाल्यास टोकनची रक्कम ग्राहकांना पूर्णपणे परत केली जाईल. विशेष बाब म्हणजे या ओला सीरीज एस स्कूटरची बुकिंग सुरू झाल्यापासून अवघ्या २४ तासांमध्ये १ लाखांहून अधिक प्री-बुकिंग्सची नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे ही ‘जगातील सर्वात पहिली सर्वाधिक बुक केलेली स्कूटर’ बनली आहे.दरम्यान, १५ ऑगस्ट रोजीच ओला आपल्या या स्कूटरचे अधिकृत आणि वॉरेंटीबाबतचे सर्व तपशील देखील जाहीर करेल. या स्कुटरच्या डिलिव्हेरीबाबतची सर्व माहिती देखील ग्राहकांना याच दिवशी मिळेल.

१० आकर्षक रंगांमध्ये होणार उपलब्ध

ओलाची ही इलेक्ट्रिक स्कूटर एस, एस १ आणि एस १ प्रो अशा ३ ट्रिममध्ये सादर केली जाईल. तसेच या मॉडेल रेंजला ओला सीरीज एस असंही म्हटलं जाऊ शकतं. ज्याचे दोन प्रकार म्हणजे – एस १ आणि एस १ प्रो. विशेष म्हणजे ही ओला इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल १० रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. या रंगांमध्ये ३ पेस्टल, ३ मेटॅलिक आणि ३ मॅट शेड्सचा समावेश असणार आहे. यापैकी पेस्टल पॅलेटमध्ये लाल, पिवळा आणि निळा, मॅट शेड्समध्ये काळा, निळा आणि राखाडी (ग्रे) तर आणि मेटल शेड्समध्ये गुलाबी, चंदेरी (सिल्व्हर) आणि ग्लॉसी रंगांचा समावेश असणार आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल १० रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार (Photo : Indian Express)

स्मार्टफोन, क्लाउड कनेक्टिव्हिटीसह असंख्य फीचर्स

इतकंच नव्हे तर या ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ग्राहकांसाठी असंख्य फीचर्स देण्यात आले आहे. त्यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, क्लाउड कनेक्टिव्हिटी, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, अलॉय व्हील्स, रिमूव्हेबल लिथियम-आयन बॅटरी यांसह अन्य अनेक फिचर्स असतील. याचसह ओला सध्या देशभर हायस्पीड ओला हायपरचार्जर देखील विकसित करत आहे. या हायपरचार्जर पॉइंटचा वापर करून. या कंपनीच्या स्कूटर्स केवळ १८ मिनिटांच्या चार्जींगवर तब्बल ७५ किमी अंतरापर्यंत चालवता येऊ शकतील.

सिंपल वनचा मोठा दावा आणि भन्नाट फीचर्स

बेंगळुरूस्थित सिंपल एनर्जीने मंगळवारी जाहीर केलं आहे की, ते आपली पहिली फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर ‘द सिंपल वन’ येत्या १५ ऑगस्ट रोजी लाँच करणार आहेत. सिंपल एनर्जीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास राजकुमार म्हणाले कि, “सिंपल एनर्जीसाठी हा एक मोठा मैलाचा दगड आहे. देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीचे नेतृत्व करण्याचं आमचं ध्येय असलं तरीही आता आम्ही मोठ्या पूर्वीपेक्षा जास्त लोकांपर्यंत अधिक वेगाने पोहोचू शकणार आहोत. या उल्लेखनीय उपक्रमाला सुरुवात करण्यासाठी आम्ही १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लाँचच्या प्रतीक्षेत आहोत.”

सिंपल वन स्कूटरकडून एक मोठा दावा करण्यात आला आहे. भारतात सद्यस्थितीत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या किंवा अगदी आगामी काळात लॉंच होणाऱ्या अशा सर्व इलेक्ट्रिक स्कूटर्सपेक्षा जास्त रेंज असल्याचा दावा ‘सिंपल वन’ने केला आहे.

सिंपल वनच्या फीचर्सबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ४.८ kWh लिथियम-आयन बॅटरी असेल. तसेच इको मोडमध्ये २४० किमीची रेंजचा दावा करण्यात आला आहे. तर या स्कूटरचा टॉप स्पीड १०० किमी/ता. आणि ३.६ सेकंदात ०-५० किमी/ता. इतका असणार आहे. इतर प्रमुख फीचर्समध्ये मिड-ड्राइव्ह मोटर आणि रिमूव्हेबल बॅटरीचा देखील समावेश आहे.

 

Story img Loader