लसूण हा आपल्या आहारातील एक किरकोळ पदार्थ असला तरी आरोग्याच्या दृष्टीने तो फार गुणकारी आहे, हे आतापर्यंतच्या अनेक संशोधनात सिद्ध झालेले आहेच. आता नवीन माहितीनुसार त्याचा वापर जीवाणूंची शरीरातील वाढ रोखण्यासाठी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही जीवाणू हे शरीरास उपकारक असतात तर काही अपायकारक असतात. क्षयासारखे रोग हे जीवाणूंच्या घातक प्रजातींमुळे होतात व ते प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्सलाही जुमानत नाहीत, पण लसूण सेवन केल्याने या जीवाणूंची संदेशवहनप्रणाली उद्ध्वस्त केली जाऊन त्यांना प्रभावहीन केले जाते. अनेक औषधांना न जुमानणारे महाजीवाणूही आता अस्तित्वात आहेत व त्यामुळे माणूस अनेक रोगांना बळी पडत असतो. त्याला लसणामुळे अटकाव होतो. कोपनहेगन विद्यापीठातील टिम होम जॅकोबसन यांनी केलेल्या संशोधनानुसार लसणामध्ये असा एक घटक असतो, जो जीवाणूंना ऱ्हॅमनोलिपिड हा विषारी स्राव रक्तात सोडू देत नाही. या विषामुळे पांढऱ्या रक्तपेशी नष्ट होत असतात, जीवाणूंचा हा घातक परिणाम लसणामुळे रोखला जात असतो. पांढऱ्या रक्तपेशी या मानवी शरीरातील प्रतिकारशक्ती प्रणालीचा महत्त्वाचा भाग असतात, त्या जंतुसंसर्गापासून शरीराचे रक्षण करीत असतात, शिवाय जीवाणूंना मारतही असतात. जेव्हा जीवाणू जैवफितीत (बायोफिल्म) एकत्र जमतात तेव्हा ते औषधांना दाद देत नाहीत. ही जैवफीत म्हणजे सेंद्रीय घटकांचा एक थर असतो. सिस्टीक फायब्रॉसिस व काही अल्सरना कारणीभूत ठरणाऱ्या सुडोमोनस एऱ्युगिनोसा या जीवाणूवर संशोधकांनी काही प्रयोग केले. उंदरांमध्ये या जीवाणूंवर प्रतिजैविकांच्या मात्रेने फारसा परिणाम झाला नाही. कारण जैवफितीची भिंत भेदण्यात प्रतिजैविकांना यश आले नाही, पण लसणातील अ‍ॅजोईन या घटकाबरोबर प्रतिजैविके वापरली असता जीवाणूंचा ९० टक्के प्रमाणात नायनाट झाला. लसणातील अ‍ॅजोइन या घटकामुळे जीवाणूतील संदेशवहन रोखले जाते. जीवाणूंमध्ये कोरम सेन्सिंग नावाची संदेशवहन प्रणाली असते, त्याच्या मदतीने एकमेकांशी संपर्क साधून ते शरीरात संसर्ग घडवीत असतात. लसणात या घटकाचे प्रमाण इतके कमी असते की, एवढा परिणाम साधण्यासाठी किमान ५० लसणाच्या पाकळ्या सेवन करणे गरजेचे असते, पण तेवढा लसूण खाणे शक्य नसल्याने तो घटक वेगळा करून त्याचा वापर जीवाणूंना मारण्यासाठी करणे योग्य ठरेल असे जॅकोबसन यांचे म्हणणे आहे.

Story img Loader