आपल्याला अनेकदा आरोग्याच्या लहान-मोठ्या तक्रारी उद्भवतात. सुरुवातीला या तक्रारी फारशा मोठ्या वाटत नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र दिर्घकाळ या तक्रारी तशाच राहिल्या तर त्या गंभीर रुप धारण करु शकतात. काही तक्रारी या गंभीर आजारांची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस जगभरात वाढत आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे रक्तदाबाशी निगडीत तक्रारी उद्भवतात. सामान्यपणे कमाल रक्तदाब १२० आणि किमान ८० हा सामान्य समजला जातो. पण ही आकडेवारी कमी-जास्त असेल तर आपल्याला रक्तदाबाचा त्रास आहे हे वेळीच ओळखायला हवे. आता हे कसे ओळखायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर खालील लक्षणांकडे विशेष लक्ष द्या.
- डोक्याच्या मागच्या बाजूला दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. रक्तदाबाचे हे एक महत्त्वाचे लक्षण असते.
- तुम्हाला विनाकारण खूप ताण आल्यासारखे जाणवत असेल तर रक्तदाब वाढला असल्याचे हे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे, ते वेळीच ओळखा.
- दिर्घकाळ चक्कर आल्यासारखे होत असेल तर या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- थोडेसे काम केल्याव तुम्हाला खूप जास्त थकवा आल्यासारखे वाटत असेल तर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असू शकतो. अशावेळी थोडेसे काही केल्यास लगेच जास्त दम लागण्याची शक्यता असते.
- नाकातून रक्त येणे ही पण उच्च रक्तदाबाची समस्या आहे. याशिवाय श्वास घेण्यामध्ये अडचण येत असतील तरीही तुम्हाला रक्तदाब असण्याची शक्यता असते.
- निद्रानाश हेही रक्तदाबाचेच एक लक्षण आहे. त्यामुळे तुम्हाला निद्रानाशाचा त्रास असेल तर डॉक्टरांकडे जाऊन रक्तदाबाची तपासणी करुन घेणे सोयीचे ठरते.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)