आपल्यापैकी बहुतेक जणांना टेरेसमध्ये किंवा बाल्कनीत सुंदर गार्डन असावं आणि त्यात छान झाडं असावीत असं वाटतं. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या बाल्कनीत किंवा टेरेसमध्ये एक छोटंसं गार्डन असणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. या बाल्कनी गार्डनमध्ये पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही बसून मस्तपैकी चहाचा आस्वाद घेऊ शकता. आपल्यापैकी बरेचजण फावल्या वेळामध्ये झाडं लावण्याचा छंद जोपासतात. मात्र लावलेल्या झाडाची योग्य काळजी न घेतल्यास कालांतराने ते झाड मरते. झाड जगवण्यासाठी, वाढवण्यासाठी विशिष्ट कौशल्याची गरज नाही. आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडतानाही आपण झाडांची काळजी घेऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– सर्वप्रथम जागा किती आहे, हे पाहूनच कोणती झाडं लावावीत हे ठरवावं. नाहीतर कमी जागेत खूप झाडं लावल्यास झाडांचं पोषण होणार नाही.

– तुमच्या बाल्कनीत तुम्ही भाज्या, फुलझाडे आणि औषधी वनस्पती लावू शकता. यात तुम्ही पालक, टोमॅटो, मिरची, तुळस अशी झाडे लावून छोटसं गार्डन तयार करू शकता.

– छोट्याशा बाल्कनी गार्डनमध्ये तुम्ही हँगिंग प्लांटर्स, रेलिंग प्लांटर्स आणि विंडो बॉक्स अश्या पद्धतीने झाडं लावून बागेची जागा वाढवू शकता.

– गार्डनमध्ये तुम्ही बिया लावलेल्या कुंड्यांना नावं द्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल कोणत्या कुंडीतं कोणती रोपं आहेत. कोणत्या रोपासाठी किती पाणी घालावं हे देखील लक्षात येईल.

– सुट्टीच्या दिवसांत आपण घरात नसल्याने पाण्याअभावी रोपं मरण्याची भीती असते. अशावेळी पाणीसाठवणीच्या भांड्यातून छोट्या नळीद्वारे कुंडीमध्ये झाडांसाठी पाण्याची व्यवस्था करता येईल. थेंबाचे प्रमाण खूप मंद ठेवावे. ज्यामुळे रोपांच्या कुंडीतला मातीचा ओलावा कायम राहील.

– झाडांच्या वाळलेल्या फांद्या, पानं आणि फुलं वेळोवेळी काढून झाडे सुदृढ ठेवावीत.

झाडांना द्या घरगुती खत-पाणी

– तुम्ही तुमच्या झाडांना अगदी स्वयंपाक घरातील जेवण बनवताना निघणारा कचरा हा कंपोस्ट बिनमध्ये जमा करून त्यात थोडी माती टाकून दोन महिने झाकून ठेवा. अश्या पद्धतीने तुम्ही पौष्टिक आणि स्वस्त खत तयार करून झाडांना देऊ शकता.

– तुमच्या घरात रोजच्या जेवणात कांद्यांचा वापर हा केला जातो. त्यामुळे तुम्ही कांद्यांच्या साली या एक लीटर पाण्यात २४ तास उन्हाळ्याच्या दिवसात आणि थंडीत ४८ तास भिजवत ठेवा. त्यानंतर ते पाणी गाळून घेऊन झाडांना पाणी देऊ शकता. याने झाडांची वाढ योग्य पद्धतीने होते.

– केळीच्या साली एका ताटात घ्या आणि कडक उन्हात वाळवा. त्यानंतर या साली उन्हात काळ्या झाल्या की त्यांची पूड तयार करून झाडांमध्ये टाकावी. केळीच्या सालांपासून तयार केलेले हे खत फळे आणि फुलांच्या वाढीसाठी उत्तम आहे.

झाडांवर आलेल्या कीटकांचे नियंत्रण

– तुमच्या झाडांवर जर मधमाश्या किंवा सोनकिडा (ladybugs) असेल तर हे चांगले कीटक आहेत. ते इतर कीटकांचा नाश करतात. त्यामुळे लक्षात ठेवा की काही नैसर्गिक किडे आहेत जे झाडं नष्ट न करता त्यांचं संरक्षणच करतात.

– एका वाटीत तुम्ही एक चमचा कडुलिंबाचे तेल, एक चमचा साबणाचे लिक्विड त्यात एक ग्लास पाणी घेऊन मिक्स करा. त्यानंतर हे पाणी झाडांवर स्प्रे करा. याने झाडांवर कीड लागणार नाही.

– झाडांना रोगांची लागण होऊ नये म्हणून ५००ग्रॅम हिरवी मिरची आलं आणि लसूण यांची पेस्ट बनवा. ही पेस्ट एक लीटर पाण्यात मिक्स करा आणि एक पूर्ण रात्र एका भांड्यात ठेऊन द्या. त्यानंतर तुम्ही झाडांवर फवारा.

पावसाळ्यात रोपांची घ्या काळजी

– पावसाळ्याच्या दिवसांत झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साचत नाही ना याची खात्री करून घ्या. कारण जर पाणी साचून राहिले तर रोपांची मुळे खराब होऊ शकतील.

– रोपांना जोरदार वारा आणि पावसापासून वाचवण्यासाठी पारदर्शक प्लॅस्टिकने चांगले संरक्षण द्या. जेणेकरून रोपांना चांगला सूर्यप्रकाश मिळेल.

– रोपांच्या कुंड्यांमध्ये जोरदार पावसाच्या सरीने पाणी साचले तर कुंडीतील अतिरिक्त पाणी काढून टाका.

– पावसाळ्यात तुम्ही झाडांना पाणी द्यायच्या वेळापत्रकात बदल करा. जर पावसाचे पाणी कुंड्यांमध्ये असेल तर काही दिवस पाणी देणे टाळा.