सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईची मोठ्याप्रमाणावर खरेदी होते. देवाला नैवेद्य दाखविण्यासाठी तर एकमेकांना देण्यासाठी मिठाईची खरेदी होताना दिसते. मात्र, मिठाईमध्ये जास्त प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असते. अशाप्रकारे झालेली भेसळ आरोग्यासाठी अतिशय घातक असते. मिठाईचे अनेक प्रकार हे दूधापासून तयार केलेले असतात. नाशिवंत पदार्थ असल्याने मिठाई ठराविक कालावधीत संपवणे गरजेचे असते. मिठाईचे आयुष्य केवळ ३ ते ४ दिवसांचे असते. मात्र, अनेकदा मिठाईची मुदत संपली तरीही विकली जाते. त्यातून मग विषबाधा होण्यासारखे प्रकार घडतात. त्यामुळे तुम्ही मिठाई खरेदी करत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे मगत्त्वाचे आहे.
१. मिठाई खरेदी केलीत तर ती ३ ते ४ दिवसांत संपवा. अन्यथा ही खराब मिठाई खाल्ल्याने आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते.
२. मिठाई घेण्याआधी त्याचा एखादा बारीक तुकडा चाखून पाहा आणि मगच खरेदी करा.
३. अनेकदा मिठाई खराब झाली आहे की नाही हे त्याचा वासावरुन आणि रंगावरुनही दिसून येते. त्यामुळे ते ओळखायला शिकायला हवे.
४. आपण कोणाला भेट म्हणून देण्यासाठी मिठाई घेत असू तर खवा, पनीर यांपासून तयार झालेली मिठाई घेऊ नका.
५. खात्री असलेल्या नामांकित दुकानातून मिठाई घेणे केव्हाही चांगले. सणासुदीच्या दिवसांत स्थानिक कोणत्याही दुकानातून मिठाई घेणे टाळा.
६. सोनपापडी किंवा इतर कोणतीही सीलबंद मिठाई असेल तर त्यावरील एक्सपायरी डेट पहायला विसरु नका. मुदत उलटून गेल्यानंतरही अशी मिठाई विकली जात असेल तर अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करा.