Tea or Coffee : चहा हे सर्वांच्याच आवडीचे पेय आहे. भारतात कित्येकांची एक कप चहाने दिवसाची सुरुवात होते. अनेक जण दिवसातून दोन ते तीन वेळा चहा पितात. चहाप्रमाणे कॉफीसुद्धा अनेकांना प्यायला आवडते. थोडा जरी थकवा जाणवला तरी कित्येक जण लगेच ‘एक स्ट्राँग कॉफी हवी’, अशी इच्छा व्यक्त करतात. तरुणांमध्ये आता कॉफीची लोकप्रियता वाढत आहे. पण जेव्हा चहा आणि कॉफी या दोनपैकी एकाची निवड करायची असते, तेव्हा मात्र प्रश्न पडतो की, कोणते पेय आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
खरे तर दोन्ही पेये जगभरात प्रचंड लोकप्रिय आहेत आणि त्यांचे अनेक फायदेही आहेत. कोणत्याही पदार्थाचे आरोग्यदायी फायदे त्या पदार्थात वापरणाऱ्या विविध घटकांवर अवलंबून असते.
चहाच्या सेवनाचे आरोग्यदायी फायदे
चहा विशेषत: ग्रीन टीमध्ये कॅटेचीन नावाचे अँटीऑक्सिडंट्स खूप जास्त प्रमाणात असतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. काही अभ्यासांनुसार चहाच्या सेवनाने हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांचाही धोका कमी होतो. त्याशिवाय चहामध्ये कॉफीपेक्षा कमी कॅफिन असते. ज्यांना कॅफिनचा त्रास होतो, त्यांच्यासाठी चहा एक उत्तम पर्याय मानला जातो. हर्बल टी नैसर्गिकरीत्या कॅफिनमुक्त असते.
कॉफीच्या सेवनाचे आरोग्यदायी फायदे
कॉफी हा कॅफिनचा महत्त्वाचा स्रोत आहे. कॉफीच्या सेवनाने व्यक्तीची सतर्कता, एकाग्रता आणि एकूणच कार्यक्षमता वाढते. काही अभ्यासांनुसार, कॉफीचे नियमित सेवन केल्याने पार्किन्सन्स, अल्झायमर व टाईप-२ मधुमेह यांसह अनेक आजारांचा धोका कमी होतो. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. विशेषत: त्यामध्ये क्लोरोजेनिक अॅसिड असते, जे हृदयाचे आरोग्य आणि चयापचय कार्य सुधारण्यास मदत करते. पण, कॉफीच्या अतिसेवनामुळे तणाव, निद्रानाश आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
चहा आणि कॉफी : बनवण्याची पद्धत महत्त्वाची
चहा आणि कॉफीचे आरोग्यदायी फायदे जाणून घेताना ही दोन्ही पेये बनवण्याची पद्धत महत्त्वाची भूमिका बजावते. उदा. चहा वा कॉफीमध्ये साखर, मलाई किंवा फ्लेवर्ड सिरपचा समावेश केल्याने या उत्तेजक पेयांचे आवश्यक ते फायदे मिळू शकत नाहीत. त्याशिवाय अतिप्रमाणात कॅलरी आणि खराब फॅट्स वाढतात. चहा किंवा कॉफी कमीत कमी सामग्रीसह पिणे सर्वांत फायदेशीर ठरू शकते.
चहा आणि कॉफी : कोणते पेय चांगले?
शेवटी चहा आणि कॉफी दोन्ही पेये आरोग्यदायी फायदे देतात. परंतु, त्यापैकी कोणते पेय निवडावे हे वैयक्तिक आरोग्याच्या गरजा आणि प्राधान्यांवर अवलंबून असते. चांगल्या अँटिऑक्सिडंट्स गुणधर्मांसह कमी कॅफिनचे सेवन करायचे असेल, तर चहा हा अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. परंतु, ज्यांना कार्यक्षमता वाढवायची आहे आणि न्यूरोलॉजिकल आजारांपासून सुरक्षित राहायचे असेल, तर त्यांच्यासाठी कॉफी अधिक फायदेशीर ठरू शकते. या दोन्ही पेयांचे आरोग्यदायी फायदे घ्यायचे असतील, तर त्यांचे मर्यादित प्रमाणातच सेवन करणे आवश्यक आहे.