गाडी चालवताना तरुण मुले जर आवडते संगीत ऐकत असतील, तर त्यांच्या हातून चुका होण्याची शक्यता जास्त असते, असा निष्कर्ष एका संशोधनातून पुढे आला आहे. इस्राईलमधील बेन गुरियन विद्यापीठामध्ये यासंदर्भात संशोधन करण्यात आले. तरुण मुलींपेक्षा मुले गाडी चालवताना जास्त आणि गंभीर चुका करतात, असेही या संशोधनात आढळले.
एकूण ८५ तरुण मुला-मुलींचे वाहन चालवण्याचे कौशल्य या संशोधनामध्ये तपासण्यात आले. प्रत्येक मुला-मुलीबरोबर वाहन चालवताना एका संशोधक व्यक्ती गाडीमध्ये बसवण्यात आला होता. गाडीमध्ये काही वेळ वाहनचालक तरुण-तरुणीचे आवडते संगीत, काही वेळ संशोधकाने ठरविलेले संगीत लावण्यात आले. त्याचबरोबर काही वेळ कोणतेही संगीत लावण्यात आले नाही. या तिन्हीवेळी वाहनचालक तरुण-तरुणी कोणकोणत्या चुका करतात, याची माहिती नोंदविण्यात आली.
वाहनचालक नियमांचे उल्लंघन करतात का, ते खूप वेगाने गाडी चालवतात का, आजूबाजूच्या वस्तूंचे किंवा रस्त्याचा बरोबर अंदाज लावतात का, याची नोंद संशोधकांनी संशोधनावेळी ठेवली.
संशोधनातून असे आढळले की, गाडी चालवताना ज्यावेळी तरुण आपले आवडते संगीत ऐकत असतात, त्यावेळी त्यांच्याकडून चुका होतात. संशोधनात सहभागी झालेल्या तरुणांपैकी ९८ टक्के तरुणांकडून अशा पद्धतीने चुका झाल्याचे आढळून आले. या तरुणांनी सिग्नल तोडणे, वेगमर्यादेचे पालन न करणे, निष्काळजीपणे लेन तोडणे, अशा प्रकारच्या चुका केल्याचे आढळले. या तरुणांपैकी ३२ टक्के जणांना नियम पाळण्यासाठी कोणीतरी गाडी चालवताना तोडी सूचना देणे गरजेचे असल्याचेही आढळून आले. बेन गुरियन विद्यापीठातील संगीतशास्त्र विभागाचे संचालक वॉरेन ब्रॉस्की आणि झॅक स्लोर यांनी हे संशोधन केले.

Story img Loader