शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच जिभेची काळजी घेणेही अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण पाहिले असेल, अनेक लोकांची जीभ काळी असते. मात्र ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. असे केल्याने भविष्यात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जिभेचा रंग आपल्या आरोग्याबाबत अनेक गोष्टी सांगतो. जर तुमच्या जिभेचा रंग बदललेला असेल तर हा अनेक रोगांसंबंधीचा संकेत आहे. सुरुवातीच्या काळात वैद्य, हकीम, डॉक्टर्स फक्त जीभ आणि डोळे तपासूनच आजार ओळखायचे. जिभेचा रंग बदलण्यामागे अनेक कारणं असू शकतात. अनेकदा औषधे किंवा कोणत्याही पदार्थामुळे काही वेळासाठी आपल्या जिभेचा रंग बदलतो, परंतु जास्त काळासाठी आपल्या जिभेचा रंग बदलला असेल तर ही धोक्याची घंटा आहे. आज आपण जिभेचा रंग बदलण्याची कारणे आणि त्याच्याशी संबंधित आजारांबद्दल जाणून घेऊया.
कसा असावा जिभेचा रंग ?
सामान्यतः जिभेचा रंग फिकट गुलाबी असतो. त्यावर हलका पांढरा थर असणे देखील सामान्य मानले जाते. जर तुमची जीभही अशीच असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
जीभ काळी असणे ‘हे’ कॅन्सरचे लक्षण ?
जीभ काळी असणे हे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. याशिवाय अल्सर किंवा फंगल इन्फेक्शन असल्यासही जिभेचा रंग काळा होण्यास सुरुवात होते असे मानले जाते. बऱ्याचदा, धूम्रपान करणाऱ्यांची जीभ देखील काळी असते.
जीभ सफेद असण्याचा अर्थ
जर जिभेचा रंग सफेद झाला असेल तर याचा अर्थ, तुमच्या तोंडाची स्वच्छता (ओरल हायजिन) वाईट आहे. तसेच, शरीरात डिहायड्रेशनची समस्या आहे. जर जिभेवरील पांढरा थर जाड झाला असेल तर धूम्रपानामुळे तुम्हाला ल्युकोप्लाकिया देखील होऊ शकतो. फ्लूमुळे कधीकधी जिभेचा रंग पांढरा होतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या जिभेची विशेष काळजी घ्यावी लागेल.
जिभेचा रंग पिवळा होण्यामागचे कारण
शरीरात पोषण तत्त्वांची कमतरता भासल्यास अनेकदा आपली जीभ पिवळी होते. याशिवाय पचनसंस्थेतील अडचण, यकृत किंवा पोटाच्या समस्यांमुळे जिभेचा रंग पिवळा होऊ लागतो. या स्थितीत जिभेवर पिवळा थर जमू लागतो.
जास्त कॅफिनमुळे जीभ होते तपकिरी
जे लोक कॅफीनचे अधिक सेवन करतात यांची जीभ तपकिरी रंगाची होऊ शकते. धूम्रपान करणाऱ्या लोकांचीही जीभ तपकिरी होऊ शकते. धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या जिभेवर तपकिरी रंगाचा कायमस्वरूपी थर तयार होऊ शकतो.
विचित्र पद्धतीने जीभ लाल होण्याचे कारण
जर तुमच्या जिभेचा रंग विचित्र पद्धतीने लाल होऊ लागला असेल तर शरीरात फॉलिक अॅसिड किंवा व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असू शकते. जिभेवर लाल डाग दिसू लागले तर त्याला भौगोलिक जीभ म्हणतात. अशावेळी तुम्हाला विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
जीभ निळी किंवा जांभळी होण्यामागचे कारण
जिभेचा रंग निळा किंवा जांभळा होण्याचा अर्थ आपल्याला हृदयासंबंधी आजार असू शकतात. जेव्हा हृदय योग्यरित्या रक्त पंप करू शकत नाही किंवा रक्तातील ऑक्सिजन कमी होऊ लागतो तेव्हा जिभेचा रंग निळा किंवा जांभळा होतो.
(येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीकरिता वैद्यकीय सल्ला घ्या.)