मुंबई-माहीम, धारावी, दांडा, तारा, वेसावा, मढ, मनोरी, चारकोप, मालवणी, गोराई तर ठाणे आणि नवी मुंबईतील ऐरोली, बोनकोडे, ओवला, वाशी-सारसोळे, बेलापूरमधील दिवाळे येथील कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेची लगबग पाहायला मिळत आहे. नारळी पौर्णिमेला कोळी महिलांसह बच्चे कंपनी घराघरांत सजावट करतात. कोळी किनारी नांगरून ठेवलेल्या होड्यांना रंगरंगोटी करतात. होड्या सजवतात. नवेद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक तयार करतात. एकूणच कोळीवाड्यातील उत्साह शिगेला पोहोचतो. काही ठिकाणी भव्यदिव्य मिरवणुका काढण्यात येतात. दर्याराजाला नारळ अर्पण करून ‘मासळीचा दुष्काळ सरू दे, दर्याचे धन माझ्या होरीला येऊ दे’, अशी मागणी करतात. त्यानंतर त्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर नाचगाणी यांच्यासह आनंदोत्सव साजरा केला जातो. सजवलेल्या बोटी समुद्रात ढकलून सागरप्रवासाचा मुहूर्त केला जातो.
असे मानले जाते की नारळीपौर्णिमेच्या दिवशी आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असते व नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व यमलहरींना ताब्यात ठेवत असल्याने जलावर ताबा मिळवणाऱ्या सागररूपी वरुणदेवतेला नारळ अर्पण करतात. या दिवशी ब्रह्मांडात आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असते, असे मानले जाते. या लहरी ब्रह्मांडात भोवऱ्याप्रमाणे गतिमान असतात. वरुणदेवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्याचे संयमन करणारी असल्याने या दिवशी सागररूपी वरुणदेवतेला आवाहन करून तिला नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते.
नारळातील पाण्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. नारळातील पाणी हे आपतत्त्वाचे प्रमाण जास्त असणाऱ्या यमलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील असते. वरुणदेवतेला आवाहन करताना तिच्या कृपाशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात. नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व या यमलहरींना ताब्यात ठेवून त्यांतील रज-तम कणांचे विघटन करून त्यांना सागरात विलीन करते; म्हणून या दिवशी वायुमंडलातील यमलहरींचे नारळाच्या माध्यमातून उच्चाटन करून सागररूपी वरुणदेवतेच्या चरणी त्यांचे समर्पण करण्याला महत्त्व आहे. यामुळे वायुमंडलाची शुद्धी होते, असे मानले जाते.
यमलहरींच्या वातावरणातील अधिक्यामुळे शरीरात अधोगामी वहाणारे वायू कार्यरत झाल्याने पाताळातून प्रक्षेपित होणाऱ्या त्रासदायक लहरी पटकन जिवाच्या तळपायाकडे आकृष्ट झाल्याने त्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते. अशीही एक(गर)समजूत आहे. त्याला वैज्ञानिक दुजोरा देत नाहीत.
नारळी पौर्णिमा कशी साजरी करतात?
कोळी बांधव ‘सण आलाय गो आलाय गो नारळी पुनवचा’ असं गाणं गात हा नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्र किनार्यालगत राहणार्या लोकांना मोठी आनंदाची असते. खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो व कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. या दिवशी कोळी बांधव बोटींची पूजा करतात. बोटींना पताका लावतात. छान रंगरंगोटी करून बोटी सजवतात. समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. सोन्याचा नारळ, म्हणजे नारळाला सोनेरी कागदाचे वेष्टन लावून सजवलेला नारळ समुद्रात विधिवत सोडला जातो. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. या दिवशी विधिवत पूजन करून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. नारळ हे फळ शुभसूचक असून, ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानले गेले आहे.
नारळी पौर्णिमेचे महत्व
संपूर्ण कुटुंबाला मागे ठेवून कोळी बांधव भर समुद्रात मासेमारीला निघतो. त्यावेळी कोळी महिलांची मदार सागरदेवावर असते. त्यामुळे कोळी महिलांच्या दृष्टीने या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त खास बनवलेल्या नारळाच्या करंजा(पूर्ण्या) यांचा नैवद्य बोटीला व समुद्राला दाखवतात. समुद्राची यशासांग पूजा करतात. खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या आमच्या धन्याचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासोळी गावू दे… असे गाऱ्हाणे कोळी भगिनी समुद्राला घालतात,’