कडधान्य शरीरासाठी आवश्यक असल्याने त्यांचा रोजच्या आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक कडधान्याचे आपापले वेगळे गुणधर्म असतात. काही कडधान्य विविध आजारांवर खूप लाभदायक ठरतात. चवळी हे कडधान्य देखील आरोग्यासाठी उपयुकत आहे. याचे नियमित आहारात सेवन केल्यास अनेक आजार दूर होतात. कारण चवळीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि प्रथिने यासारखे बरेच पोषक घटक असतात. विशेष म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास आणि बळकट करण्यास चवळी मदत करते.
चवळीत फायबरचं प्रमाण अधिक असल्यामुळे पाचकशक्ती सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं. गरोदर महिलांनी याचं आहारात आवर्जून सेवन करायला हवं. कारण गरोदरपणात कॅल्शिअमची झीज होत असते. त्यामुळे चवळीचे सेवन केल्याने कॅल्शिअमची झीज भरून निघते व बाळाची योग्य वाढ होते. आणि प्रसूतीच्या वेळेस त्रास होत नाही.
चवळीमध्ये व्हिटॅमिन सी आणि प्रथिने असतात. ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. हे संक्रमक रोग होण्यापासून रोखतात. करोना कालावधीमध्ये अनेक डाॅक्टर चवळी खाण्याचा सल्ला देतात. चवळी मधुमेह असणार्या रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये कॅल्शिअमचं प्रमाण अधिक असल्याने ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. म्हणूनच भरपूर प्रमाणात कॅल्शिअम मिळत असल्याने या भाजीचं आवर्जून सेवन करावं.
आता चवळीचं सॅलड कसं बनवायचं ते जाणून घेऊयात…
साहित्य:-
१ वाटी शिजवलेली चवळी
१ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
१ वाटी बारीक चिरलेली काकडी
१ आंबा
५० ग्रॉम चीज
अर्धी वाटी शेंगदाणे
१ वाटी कोथिंबीर
१ वाटी लिंबाचा रस
१ टी-स्पून दालचिनी पावडर
१ टी-स्पून काळीमिरी पूड
१ टी-स्पून जिरे पूड
१ टी-स्पून चाट मसाला
१ टी-स्पून मध
चवीनुसार काळे मीठ
कृती :
एका बाऊलमध्ये शिजवलेली चवळी घ्या. त्यात बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेली काकडी, बारीक कापलेला आंबा, टाकून हे मिश्रण चांगले एकजीव करा. त्यानंतर त्यात लिंबाचा रस, बारीक वाटलेले शेंगदाणे, दालचिनी पावडर, काळीमिरी पूड, जिरे पूड, चाट मसाला, काळे मीठ टाकून मिक्स करा. त्यानंतर यात मध आणि कोथिंबीर टाकली की चवळी सॅलड खाण्यास तयार आहे.
चवळीच्या सॅलडमध्ये वापरले जाणारे दालचिनी पावडर आणि कळीमिरी पावडर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते. तर लिंबूचा रस व टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने आपल्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता भासत नाही. तसेच काळं मीठ हे अन्न पचवण्यास मदत करते. त्यात टोमॅटो, आंबा आणि काकडी हे फायटोकेमिकल्स असल्याने पोटात जळजळ होत नाही.