‘संसार हा खऱ्या अर्थाने एक दिवस आणि एका रात्रीचाच असतो. उरलेले सगळे दिवस हे त्या दिवसाची पुनरावृत्ती असतात.’ असं व. पु. काळेंचं प्रसिद्ध वाक्य आहे. नव्याने लग्न होऊ घातलेल्या, नव्याने लग्नबंधनात अडकलेल्या आणि संसारात दोन-तीन वर्षांपासून रमलेल्या प्रत्येक मिलेनिअल्सच्या पिढीसाठी हे वाक्य अत्यंत तंतोतंत लागू पडतं. पूर्वी संसार खुलायचा, फुलायचा. अगदी रांगोळीत उठून दिसेल अशा रंगांनी रंगून निघायचा. पण काळ बदलत गेला आणि या रांगोळीचे रंग फिके पडत गेले, काहींच्या बाबतीत तर पुरते बदलून गेले. पिढ्या पुढे सरकत गेल्या. परंतु, संसारातील नियम, चौकटी कमी-अधिक प्रमाणात तशाच राहिल्या. परिणामी संसारात संवाद जवळपास संपला आणि विसंवाद वाढत गेला. मागच्या १० ते १५ वर्षांत झालेले घटस्फोट हे त्याचंच द्योतक आहेत.
लग्न म्हणजे नवरा-बायकोचा संवाद असतो, फक्त शारिरीक दृष्ट्या एकत्र येणं नाही तर मानसिक दृष्ट्या एकत्र येणं म्हणजे संसार. बरं लग्न फक्त दोघांना एकत्र आणत नाही तर दोघांची घरं जोडतं. पण इतका विचार करायला वेळच नसल्याने जोडप्यांना विभक्त होण्यावाचून पर्याय उरला नाही. विभक्त होण्याची असंख्य कारणं असतील. वर्षानुवर्षे एकत्र राहिलेली जोडपी उतारवयातही एकमेकांपासून दूर जातात. पण हल्ली लग्नाच्या पहिल्या दोन ते पाच वर्षांतच घटस्फोट घेण्याचं प्रमाण वाढल्याने जोडप्यांमधील या वादाच्या कारणांची मीमांसा करणं गरजेचं आहे. गौतम सिंघानिया आणि नवाज मोदी यांचा ३२ वर्षांचा संसार मिटला. मात्र त्यांची कारणं फार म्हणजे फारच वेगळी आहेत. श्रीमंती, दिमतीला नोकर-चाकर हे सगळं असलं तरीही संवाद महत्त्वाचा असतो. तो संपला की इतक्या वर्षांचं नातंही तुटतंच. मग आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. पती-पत्नी विभक्त झाले की ते एकमेकांशी जन्मोजन्मीचे शत्रू असल्यासारखेच वागतात हे गौतम सिंघानियांनी दाखवून दिलं. मात्र हे झालं कॉर्पेरेट जगातलं. तुमच्या आमच्या सारख्यांच्या मध्यमवर्गीय घरातले खटके उडण्याची कारणं वेगळी आहेत.
हेही वाचा >> लग्नाच्या दिवशी इतरांपेक्षा सुंदर दिसायचयं? मग आहारात काय बदल करावा लागेल? तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या
सन १९८१ ते १९९६ मध्ये जन्माला आलेल्यांना मिलेनिअल्सची पिढी म्हणतात. खरं प्रेम आणि संसार पाहिलेली आणि अनुभवलेली ही कदाचित शेवटची पिढी. याच्या पुढच्या पिढीने म्हणजे जनरेशन झेडने एक पाऊल पुढचं टाकलं आहे. नात्यांमधील अनेक नव्या संकल्पना त्यांनी आधीच शोधून ठेवल्या आहेत. त्यामुळे या जेन झेडमधील मुला-मुलींना कदाचित संसार, लग्नाची संकल्पना मान्यच नसतील. परंतु, मिलेनिअन्सचा लग्न संस्थेवर विश्वास असला तरीही त्यांचा त्यांच्या नात्यातच बराच गोंधळ झालेला पाहायला मिळतो. त्यामुळे लग्न का करावं? या निष्कर्षाप्रती अनेक जोडपी येऊन ठेपली आहेत. ही परिस्थिती का निर्माण होते, यामागची कारणं शोधणं गरजेचं आहे.
मिलेनिअल्सच्या नात्यांत गोंधळ होण्यामागचं कारण म्हणजे या पिढीतील पालकांच्या मनावर असलेल्या रुढींचा पगडा. घरातील सुनेला अर्थाजर्नाचं स्वातंत्र्य दिलं असलं तरीही तिला कौटुंबिक जबाबादऱ्यांतून मुक्त केलेलं नाही. या जबाबादाऱ्यांतून कायमचं मुक्त व्हावं अशी सुनांची इच्छाही नाही. परंतु, घरात दोघेही कमवून आणत असतील, घरातील आर्थिक भार दोघांनीही बरोबरीने तर बऱ्याच घरात तिने कांकणभर जास्तच पेललेला असतो. त्यामुळे, घरगुती जबाबदाऱ्याही दोघांनी समान वाटून घेणं गरजेचं आहे. परंतु, एकत्र कुटुंबात या गोष्टी घडत नाहीत. ‘मी माझ्या मुलाला एवढ्या वर्षात किचनमध्येही जाऊ दिलं नाही, मग आता त्याने का जावं?” असा प्रश्न विचारणाऱ्यांना आयांनी निदान सुनेच्याही बालपणात डोकावून पाहायला हवं. तिलाही तिच्या आई-वडिलांनी अत्यंत लाडाकोडात वाढवलेलं असतं. लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांसाठी तिने तिची मानसिक तयारी केलेली असली तरीही या जबाबदाऱ्या पेलताना कोणी भार हलका केला की तिलाही आनंदाचे दोन क्षण जगता येतील. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांना वाढवताना अमुक कामं मुलांची आणि तमूक कामं मुलींची अशी विभागणी न करता सरसकट सर्वच मूलभूत कौशल्य दोघांनाही शिकवल्यास येणाऱ्या पिढ्या लग्न संस्था टिकवू शकतील.
हेही वाचा >> लग्नात नवरीचा HD Makeup का करतात? काय आहे ‘एचडी मेकअप’? ब्रायडल मेकअप करण्याआधी जाणून घ्या…
दुसरा मुद्दा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. सुनेनं घेतलेलं शिक्षण हे तिने केवळ अर्थाजर्नापुरतं वापरावं. इतर भौतिक, सामाजिक, कौटुंबिक निर्णय घेताना तिची मते विचारात न घेतल्यास नात्यांमध्ये मतभेद होऊ लागतात. मिलेनिअल्समध्ये जन्माला आलेल्या मुलींमध्ये शिक्षणाचं प्रमाण आधीच्या पिढीपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे या पिढीतील मुली विचार करू शकतात, निर्णय घेऊ शकतात, निर्णय बदलवू शकतात यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यांना त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणंही बंधनकारक आहे. परंतु, नात्यांमध्ये ही सोय नसल्याने किंवा एकत्र कुटुंबात अशी संधी मिळत नसल्याने मुलींची घुसमट होते आणि परिणामी नाती दुरावत जातात.
तिसरा मुद्दा करिअरचा. या पिढीतील तरुणांनी उच्च शिक्षणामुळे उंच भरारी घेतली आहे. प्रत्येकाला आपआपल्या क्षेत्रात पुढे झेप घेण्याची आकांक्षा असते. परंतु, अनेकदा विविध कारणांनी मुलींना, सुनांना यासाठी अडवलं जातं. त्यांच्यावर नियंत्रण आणून अडकवलं जातं. आपल्या मुलापेक्षा सुनेने जास्त कमावलं तर सून डोक्यावर बसून मिऱ्या वाटेल या समजुतीमुळे संघर्ष निर्माण केला जातो. परंतु, सुनेची झालेली प्रगती सर्वार्थाने कुटुंबालाच हातभार लावणारी असते हे आधीच्या पिढीच्या लक्षात येत नसल्याने मिलेनिअल्सच्या नात्यात अडचणी निर्माण होतात.
हेही वाचा >> जोडप्यांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्यामागे ‘हे’ एक असू शकते कारण? डाॅक्टर सांगतात, “लैंगिक जीवन खूप…”
अशा परिस्थितीत साथीदार किती साथ देतो हे महत्त्वाचं असतं. मिलेनिअल्स पिढीतील जोडप्यात पुरुषांनी महिलांना सर्वतोपरी मदत केल्यास नाती खुलत जातील. परंतु, फार कमी प्रकरणात जोडीदाराकडून साथ मिळते. या जोडप्यातील पुरुषांची गोची झालेली आहे. आई-वडील की बायको या कात्रीत ते सापडल्याने त्यांची कोंडी होते. ही परिस्थितीसुद्धा परंपरेने चालत आलेली आहे. परंतु, या पिढीकडे ही परंपरा मोडीत काढून खऱ्याची बाजू घेण्याची संधी आहे. जो जिथं चुकेल तिथं त्याची चूक सांगण्याची हिंमत या पिढीने दाखवली तर येणाऱ्या पिढ्यांमध्ये असा वादच निर्माण होणार नाही. परंतु, अनेक ठिकाणी असं होत नाही. परिणामी शिकल्या सवरल्या मुलींची घुसमट सुरू होते. यामुळे नाती तुटतात. नात्यांमध्ये बहर येण्याआधीच कोमेजून जातात. गेल्या पाच वर्षात अशी अनेक जोडपी तयार झाली, जी फक्त आता नाईलाजाने एकत्र राहत आहेत. त्यांच्यात पती-पत्नीसारखं गोड नातं राहिलेलं नाही. मुलांच्या किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ते एकमेकांपासून विभक्त होऊ शकत नाहीत. परंतु, ही नाती केव्हाच मानसिकरित्या विभक्त झालेली असतात. अशी कुरुप, बेरंग नाती निर्माण होऊ नये यासाठी या पिढीतील लोकांनी आधीच्या पिढीतील रुढी आत्मसात करताना त्यात तत्कालीन बदल करणं गरेजचं आहे. तसंच, आधीच्या पिढीनेही आजच्या पिढीला त्यांच्या नात्यातील स्वातंत्र्य देणं गरेजचं आहे. तरंच, लग्नसंस्थेसारखी संकल्पना टीकून राहू शकेल.