मनुष्य झोपेतही नवीन शिकत असतो आणि झोपेतून उठल्यावर त्या गोष्टीचा परिणाम त्याच्यावर जाणवतो, असे नवीन संशोधनात आढळले आहे.
इस्त्रायलमधील वाइझमन इन्स्टिस्ट्यूटमध्ये झोपेबाबत संशोधन करण्यात आले. झोपलेल्या व्यक्तींना एक विशिष्ट आवाज ऐकवला गेला. त्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा गंध सोडण्यात आला. झोपलेल्या व्यक्तीकडून हा गंध हुंगला गेला आणि आवाज ऐकत असल्याचे परीक्षणाअंती सिद्ध झाले. गंध आणि आवाजामुळे या परीक्षणातील व्यक्तींची झोपमोड झाली नाही. उलट त्यातील काही गंधांमुळे त्यांना आणखी गाढ झोप येत असल्याचे आढळले.
जागे असताना येणा-या गंधामुळे मेंदू जसा जास्त कार्यान्वित होतो. त्याचप्रकारे झोपेत असताना येणा-या गंधामुळेही व्यक्तींचा मेंदू कार्यान्वित होतो, असे आढळले. एखादा सुगंध आला तर व्यक्ती जास्त खोलवर श्वास घेतो आणि दुर्गंध आला तर श्वास घेण्याचे थांबवते किंवा खोलवर श्वास घेत नाही, असे आढळले. व्यक्ती जागी असताना आणि झोपलेली असतानाही अशाच प्रकारची प्रतिक्रिया देते. अशा प्रकारचे होणारे संस्कार मेंदूच्या हिप्पोकॅम्पस या स्मृती बनवण्याचे कार्य करणा-या भागाशी संबंधित असतात. त्यामुळे झोपेची ही अवस्थाही झोपेत शिकण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. हे संशोधन ‘सायन्स न्युरोसायन्स’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे.

Story img Loader