पालकांनो लक्ष द्या! आपले पाल्य जर रात्री पुरेशी झोप घेत नसेल तर त्याला टाइप-२ चा मधुमेह होण्याचा धोका असल्याचा इशारा अभ्यासामध्ये देण्यात आला आहे. ब्रिटनच्या सेंट जॉर्ज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले. यासाठी ९ ते १० वर्षांच्या ४ हजार ५२५ मुलांना प्रश्नावली देण्यात आली. तसेच त्यांचे शरीर मापन, रक्ताच्या नमुन्याचे परिणाम तपासण्यात आले.
जी मुले योग्य प्रमाणात झोप घेत होती त्यांचे वजन आणि चरबीची पातळी नियंत्रणात होती. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिन योग्य प्रमाणात दिसून आले. ब्रिटनच्या ‘द नॅशनल हेल्थ सव्र्हिस’ (एनएचएस) ने झोपेचा अवधी हा १० वर्षांच्या मुलासाठी १० तास इतका असावा असे म्हटले आहे.
झोपेचा अवधी वाढवल्याने शरीरामधील चरबीची पातळी कमी करणे तसेच टाइप-२ चा मधुमेह सुरुवातीच्या आयुष्यामध्ये होण्यापासून बचाव होतो, असे सेंट जॉर्ज युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक क्रिस्टोफर ओवेन यांनी म्हटले आहे. लहान वयात पुरेशी झोप घेतल्याचे फायदे प्रौढावस्थेत दिसू शकतात. त्यामुळे आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होते.
लोकांनी झोपेचा कालावधी अर्ध्या तासाने (१०.५ तास) वाढविल्याचा संबंध ०.१ किलोग्रॅम प्रति वर्ग मीटर बॉडी मास इंडेक्सशी (बीएमआय) असतो. तसेच ०.५ टक्के इन्सुलिन प्रतिकार रोखण्यात येतो, असे संशोधकांनी सांगितले.
ही पातळी कमी केल्यास दीर्घकाळापर्यंत टाइप-२ चा मधुमेह होण्याचा धोका कमी होत जाते, असे त्यांनी म्हटले आहे. हे संशोधन बालरोगचिकित्सक या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.