मार्क बोये हा आयरिश माणूस गेल्या काही दिवसांपासून पैशांशिवाय जीवन जगत असून, त्याचा काही बॅंक बॅलन्स आहे, ना त्याच्याकडे आहेत खर्चासाठी पैसे. ऐकून धक्का बसला ना? चला तर मग त्याच्याच शब्दांतून जाणून घेऊया, त्याच्या या पैशाविना जगण्याविषयी…
सात वर्षांपूर्वी व्यवसाय आणि अर्थशास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षी जर मला कोणी पैशाशिवाय जगायला सांगितले असते, तर मी त्या गोष्टीला हसण्यावारी नेले असते. त्यावेळी मी चांगल्या नोकरीचे, भरपूर पैसे कमवण्याचे आणि किमती वस्तू खरेदी करून समाजात एक यशस्वी व्यक्ती म्हणून स्थान निर्माण करण्याचा विचार करीत होतो.
काही काळा मी असे जीवन जगलो देखील. एका मोठ्या ऑरगॅनिक खाद्यपदार्थाच्या कंपनीचे व्यवस्थापन पहाण्याचे उत्कृष्ट काम माझ्याकडे होते. माझी स्वत:ची नाव होती. जर मी ‘गांधी’ नावाचा व्हीडिओ पाहिला नसता, तर आजही मी तीच जीवनशैली जगत असतो. गेल्या पंधरा महिन्यांपासून ना मी एक पैसा कमावला आहे, ना खर्च केलाय.
एका संध्याकाळी नावेवर मित्रासोबत गप्पा मारत असताना या बदललेल्या जीवन जगण्याविषयीच्या विचारांची सुरुवात झाली. त्याआधी महात्मा गांधींच्या ‘जगात तुम्हाला जो बदल हवा आहे, त्याची सुरूवात तुमच्यापासून करा’ या वाक्याचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव झाला. आम्ही दोघांनी जगाला भेडसावणा-या अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. त्यात निसर्गाचा -हास, नैसर्गिक साधनांसाठी चालेल्या लढाया आणि श्रमिक कामगारांच्या समस्या असे अनेक मुद्दे होते. असे असले तरी नेमके कळत नव्हते की यातील कोणत्या गोष्टीसाठी आपला वेळ द्यावा. या दूषित सागरातला आपण एक थेंब असल्याची जाणिव असल्याने आपण काही बदल घडवून आणू शकू, असे वाटत नव्हते.
या सर्व समस्यांच्या मुळाशी एक सामाईक कारण असल्याचे त्या संध्याकाळी मला जाणवले. खरेदी करण्याच्या आपल्या क्षमतेचा लोकांवर, निसर्गावर आणि प्राण्यांवर होत असलेला परिणाम आपण लक्षात घेत नाही. या सर्व समस्यांच्या मुळाशी हेच एक कारण असल्याचे मला वाटते.
खरेदीदार आणि खरेदीच्या तफावतीत एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे की आता यामुळे होणा-या विध्वंसाची आणि समस्यांची जाणिवच आपल्याला राहिलेली नाही. फार कमी लोकांना दुस-याला त्रास द्यावा, असे वाटते. पण ब-याच जणांना याची जाणिव नाही की ते तसे करत आहेत. ज्यामुळे ही तफावत निर्माण झाली आहे, ते कारण आहे पैसा. खास करून या जागतिकीकरणाच्या स्वरूपात.
उदाहरणादाखल मी सांगेन, जर आपण स्वत: अन्न पिकवले, तर आपण ते वाया घालवणार नाही. जे आपण आता करतो आहोत. जर आपण स्वत: टेबल आणि खुर्ची बनवली, तर घरातील इंटिरिअर डोकोरेशनमध्ये बदलल्यावर आपण ते फेकून देणार नाही. जर आपल्याला स्वत:ला प्यायचे पाणी स्वच्छ करायला लागले, तर कदाचीत आपण ते खराब करणार नाही. त्यामुळे जगात घडून आलेला बदल पाहण्यासाठी मला पैशाचा त्याग करण्याची आवश्यकता भासली. सुरुवातीला एक वर्षासाठी असे करण्याचे ठरवले होते. प्रथम मी जगण्यासाठी गरजेच्या अशा मुलभूत गोष्टींची यादी तयार केली. जगण्यासाठी अन्न गरजेचे असल्याने त्याला प्रथम प्राधान्य होते. यासाठी चार पर्याय होते. शिकार करून खाणे, स्वत: अन्न पिकवणे, वस्तूंची देवाण-घेवाण करून अन्न मिळवणे आणि लोकांना नको असलेले जास्तीचे टाकून दिलेले जेवण मिळवणे.
पहिला दिवस मी लोकांनी टाकून दिलेल्या अन्नावर घालवला. जेवणासाठी मी स्वतः पिकवलेल्या अन्नधान्याचा आधार घेतो, क्वचित प्रसंगी लोकांनी टाकून दिलेल्या अन्नावर वेळ भागवतो. मी स्टोव्हवर जेवण बनवतो. ज्या ऑरगॅनिक फार्मवर काम करत होतो, तिथे पार्क केलेल्या एका राहण्यासाठीच्या गाडीमध्ये माझ्या वास्तव्याची सोय केली. जाळण्यासाठी आणि उजेडासाठी मी लाकडाचा वापर करतो. त्याचप्रमाणे मी पिकवत असलेल्या भाजीपाल्यासाठी मलमुत्राचा जैविक खत म्हणून वापर करतो. प्रकाशासाठी मधमाशांच्या पोळ्यातील मेणापासून मेणबत्त्या बनवल्या आहेत. नदीत अंघोळ करतो आणि दात स्वच्छ ठेवण्यासाठी कटलफिशच्या हाडांचा आणि जंगली फळाच्या बियांचा वापर करतो.
अनेकजण मला म्हणतात, मी भांडवलशाहीच्या विरोधात आहे. मर्यादित भूतलावर अमर्याद प्रगतीची गरज हा भांडवलशाहीचा मुलभूत दोष असल्याचे मला वाटते. मला निसर्ग, समाज आणि आनंद हवा आहे आणि नेमके हेच मला सापडत नाहीये. निसर्गाच्या -हासामुळे आनंद मिळाला असता तर या गोष्टींना काही अर्थ होता. परंतु, औदासिन्य, गुन्हे, मानसिक ताण, लठ्ठपणा, आत्महत्या आणि या सारख्या अनेक दु:ख देणा-या प्रमुख घटनांमध्ये वाढ होत आहे. यावरून असे दिसते की जास्त पैसा म्हणजे जास्त सुख नव्हे.
माझ्या जीवनातले हे सर्वात जास्त असे आनंदी वर्ष मी अनुभवले. माझ्या मित्र परिवारामध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत मी आजारी पडलो नाही. खरी सुरक्षितता पैशात नसून मैत्रित असल्याचे या काळात मला उमगले. ब-याचशा पाश्चिमात्यांचे आध्यात्मिक दारिद्र्य असून, स्वातंत्र्य हे प्रत्यक्षात परस्परावलंबित्व आहे.
जेव्हा आपण ख-या अर्थाने नैसर्गिकरित्या जगू, तेव्हा आपण पैशांशिवाय जीवन जगू. या भूतलावर मानव हा फक्त असा जीव आहे, जो पैशाचा वापर करतो, कदाचित आपण असा एक जीव आहोत ज्याने निसर्गापासून फारकत घेतली आहे.
लोक मला विचारतात व्यवसाय आणि पैशाच्या ज्या दुनियेतून तू आला आहेस, त्याच्याशी आताच्या तुझ्या जगण्याची तुलना केल्यास तुला कशाचा अभाव वाटतो. त्यावर माझे उत्तर आहे, ताण, वाहतूक कोंडी, बॅंक स्टेटमेन्टस आणि युटिलिटी बिल्स!
(सौजन्य – http://worldobserveronline.com)
पैशांविना ‘तो’ जगतोय आनंदी जीवन!
मार्क बोये हा आयरिश माणूस गेल्या काही दिवसांपासून पैशांशिवाय जीवन जगत असून, त्याचा काही बॅंक बॅलन्स आहे, ना त्याच्याकडे आहेत खर्चासाठी पैसे. ऐकून धक्का बसला ना? चला तर मग त्याच्याच शब्दांतून जाणून घेऊया, त्याच्या या पैशाविना जगण्याविषयी...
First published on: 09-10-2013 at 12:31 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The man who lives without money