दिवाळ सणाची चाहूल लागताच खरेदीचाही हंगाम सुरू होते. तरुण मुली आणि खरेदी हे तर समीकरण. खरेदीचे हे पारंपरिक नाते कायम ठेवण्यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. दिवाळी पार्टी आणि पहाट सोहळ्यांना सर्वामध्ये उठून दिसायची लगबग सर्वत्र सुरू झाली असून बाजार खरेदीत काही तरी वेगळे शोधण्याकडे अनेकांचा कल असतो. यंदा दिवाळीच्या बाजारात एथनिक (पारंपरिक) वस्त्रांच्या भलतीच मागणी असल्याचे चित्र आहे. त्यामधील वैविध्य भुरळ पाडणारे आहे. एरवी जिन्स, स्कर्ट घालणाऱ्या तरुणी सणांच्या काळात मात्र आवर्जून पारंपरिक पेहराव करतात. अशा वेळी त्यांना आपण अगदीच आऊट ऑफ फॅशन नाही ना याची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या बाजारात नांदत असलेल्या पारंपरिक वस्त्रांचा घेतलेला वेध..
डिझायनर पंजाबी ड्रेस
अनारकली प्रमाणेच पंजाबी ड्रेसमधील पटियालाची फॅशन आजही जोरात आहे. घेरदार पटियाला त्यावर गुडघ्यापर्यंत कुर्ती आणि हेवी दुपट्टा या कॉबिनेशनची सध्या चलती आहे. पंजाबी ड्रेस महाग असतात अशी बोंब ठोकणाऱ्यांसाठी सध्या एक सोपा पर्याय उपलब्ध आहे. हाफ स्टिच डिझायनर पंजाबी सूटचे कापड मिळते. त्यामुळे फिटिंगची काळजी मिटते. आपण आपल्या मापाचा मस्त शिवून घेऊ शकतो. सध्या पंजाबी ड्रेसेसमध्ये ब्राइट आणि वायब्रेंट कलर प्रधान्यांने वापरले जात आहेत. त्यामध्ये ऑरेंज आणि नेव्ही ब्लू, येलो अॅण्ड पिंक अशा कॉम्बिनेशची चलती आहे. त्यावरील मिरर किंवा कुंदन वर्कच्या दुपट्टय़ामुळे परफेक्ट दिवाळी पार्टी लुक तयार होतो.
लॉँग कुर्ती अॅण्ड स्कर्ट
यंदा बाजारामध्ये तरुणींना भुरळ पाडेल अशा पद्धतीचे लाँग हायवेस्ट स्कर्ट आणि त्यावर कॉन्ट्रास्ट लाँग कुर्ता असे भन्नाट कॉम्बिशन अवतरले आहे. त्यामध्ये फ्लोरल प्रिंटचा स्कर्ट, हेवी नेकलाइनचा कुर्ता किंवा सिल्क मटेरिअलचा बुट्टीवाला कुर्ता आणि गोल्डन स्कर्ट अशे असंख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. यावर हवे तर दुपट्टाही घेता येऊ शकतो.
पलाझ्झो ड्रेस
नेहमीच्या लेगिंग्स, सलवार, चुडीदार यांना ब्रेक देत पलॅझो, घागरा पँट, घागराज ट्राय करायला हरकत नाही. फॅशनच्या दुनियेत सीमोल्लंघनाला अधिक महत्त्व आहे. नेहमीच्या सीमा मोडायची तयारी अनेकांची असते. तरुणींचा कल आता सुटसुटीत पलाझ्झोकडे वळताना दिसून येत आहे. नेहमी नेहमी कुर्तीवर लेगिंग्स घालण्यापेक्षा आता सुटसुटीत पलाझ्झोला महिलावर्ग अधिक पसंती देऊ लागला आहे. भरदार नक्षी केलेली कुर्ती त्यावर घेरदार पलाझ्झो पॅन्ट, साजेसे दागिने किंवा केवळ भरगच्च कानातले घातल्यावर साजेसा असा लुक येतो. नेहमीच साडी किंवा अनारकली ड्रेस परिधान करणाऱ्या तरुणी आता हे पलाझ्झो आणि जरदोसी प्रिंट असलेले कुर्ते पसंत करत आहेत.
एथनिक गाऊन
सध्या पारंपरिक वस्त्रांमध्ये आणखी एका वस्त्राची भर पडली आहे. ते म्हणजे एथनिक गाऊन. भरगच्च कलाकुसर केलेली नेकलाइन असलेला पायघोळ गाऊन आता सण-समारंभासाठी प्राध्यान्य बनत चालला आहे. हल्लीच्या फ्युजनच्या काळात गाऊन, लेगिंग्ज आणि दुपट्टा असे कॉम्बो सेट आपल्याला बाजारात मिळतो. मात्र स्टायलिंग करताना आपल्याला केवळ गाऊन घालायचा आहे की त्यावर दुपट्टा कॅरी करायचा आहे हे आपणच ठरवायचे असते.
अनारकली ड्रेस
फॅशनच्या दुनियेत काही गोष्टी बराच काळ तग धरून राहतात त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनारकली ड्रेस. अनारकली ड्रेसेसची फॅशन कमी झाली असे अनेकांचे मत असले तरी बाजाराची हवा मात्र तसे काही दर्शवीत नाही. या ड्रेसचे वैशिष्टय़ म्हणजे हे कोणत्याही शरीरयष्टीला शोभून दिसतात. हल्ली बाजारात मोठय़ा घेरच्या अनारकलीची चलती आहे. फक्त अनारकली घेताना नेहमीचे कॉमन पॅटर्न घेऊ नका असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फ्लोअर लेन्थ अनारकली म्हणजेच थेट पायघोळ, जमिनीपर्यंत येणारा पेहराव अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. त्यावर कुंदन, जरी, रेशम, जरदोसी असे नाजूक वर्क निवडण्याचे स्वातंत्र्य आहेत. शक्यतो खडे, मोती, टिकल्या नको. हे अनारकली फार सुंदर दिसतात. त्यामध्ये नेट, शिफॉन, जॉर्जेटसारख्या मटेरिअलमध्ये मरून, नेव्ही ब्लू, गोल्डन यलो, अॅक्वा ब्लूसारखे रंग अधिक खुलून दिसतात.
कुठे मिळतील?
दादर, परेल, बोरिवली, अंधेरी येथील खास सणासुदीच्या कपडय़ांच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठांमध्ये हे कपडे उपलब्ध आहेत. सध्या मॉल्समध्येही फेस्टीव्ह कलेक्शन्स लागली आहेत. या कपडय़ांच्या किमती साधारणपणे ५०० रुपयांपासून पाच हजारांपर्यंतच्या घरात जातात.