‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ हा प्रश्न आपल्यापैकी सर्वानाच पडत असतो. प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी असते. पण शरीरशास्त्राच्या दृष्टीने सुखी माणसांच्या मेंदूत करडय़ा रंगाचे द्रव्य जास्त असते. जपानमधील क्योटो विद्यापीठातील वाटारू साटो व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते सुखाची भावना व जीवनातील समाधानाची भावना या मेंदूतील प्रेक्युनस या पॅरिएटल लोबमधील भागात जाणवतात.
माणसाला भावना वेगवेगळ्या प्रकारे जाणवतात, त्यात सुख ही एक भावनाच आहे, जेव्हा शाबासकीची थाप मिळते तेव्हा तिची अनुभूती अधिक असते. मानसशास्त्रज्ञांच्या मते हे भावनेशी निगडित मुद्दे आपल्याला सुखाची अव्यक्त जाणीव देत असतात. ती काही वस्तुनिष्ठ संकल्पना नाही. मेंदूतील न्यूरॉन्सची एक यंत्रणा सुखाच्या अनुभूतीस कारण असते, पण अजूनही ती पूर्णपणे सापडलेली नाही. तेथेच सुखाचे मोजमाप होत असते. ते मात्र वस्तुनिष्ठ पातळीवर असते.
संशोधकांनी या प्रयोगात काही व्यक्तींच्या मेंदूचे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग केले. त्यांना भावना, समाधान याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. विश्लेषणाअंती असे दिसून आले की, ज्या लोकांच्या प्रेक्युनियस या मेंदूतील भागात करडय़ा रंगाचे द्रव्य अधिक आहे त्यांना सुख किंवा समाधानाची जास्त अनुभूती मिळाली. ज्या लोकांना सुख जाणवत होते, पण दु:ख कमी जाणवत होते त्यांच्यात प्रेक्युनियस भाग मोठा होता. यापूर्वी अॅरिस्टॉटलपासून सगळ्यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं यावर विचार मांडले आहेत, पण सुखी माणसाचा सदरा शोधूनही सापडणार नसला तरी वैज्ञानिकांनी सुखाची संकल्पना मूर्त स्वरूपात काहीशी शोधली आहे. अनेक अभ्यासांत असे दिसून आले आहे की, ध्यानधारणेने मेंदूतील प्रेक्युनियस हा करडय़ा रंगाचा भाग वाढतो व त्यामुळे मेंदूत सुखाच्या भावनेची वस्तुनिष्ठ अनुभूती मिळावी यासाठी शास्त्रोक्त कार्यक्रम तयार करता येऊ शकतात, असा साटो यांचा दावा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा