घरात किंवा घराच्या आसपास आढळणाऱ्या माश्या घाण पदार्थावरून उडून त्या उघडय़ा अन्नावर बसतात व अन्न दूषित करतात. या माशा आपल्यासोबत विविध शेकडो हानीकारक प्रजातींचे सूक्ष्मजंतू आपल्यासोबत घेऊन येतात. यामुळे अनेक आजार पसरतात, असा इशारा अभ्यासात देण्यात आला आहे.
माश्यांच्या पायांवर लक्षावधी सूक्ष्मजंतू असतात व एका खाद्यपदार्थावरून दुसऱ्या खाद्यपदार्थावर त्यांच्या उडण्यामुळे निरनिराळय़ा खाद्यपदार्थात हे जंतू मिसळले जातात. व त्यामुळे पटकी (कॉलरा), हगवण, टायफाइड यासांरख्या अनेक रोगांचा फैलाव होतो. अमेरिकेच्या पेनसिल्वेनिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले असून, लोकांनी बाहेर फिरायला गेल्यानंतर उघडय़ावरील पदार्थ खाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
११६ घरमाश्या आणि इतर माश्यांच्या अभ्यासात, या माशा मानवासाठी हानीकारक असणाऱ्या सूक्ष्मजंतूंच्या अनेक प्रजाती आपल्यासोबत घेऊन येतात. सूक्ष्मजंतूंच्या पसरण्यामध्ये माश्यांचा मोठा वाटा असून, यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे पेनसिल्वेनिया स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधक डोनाल्ड ब्रयन्ट यांनी म्हटले आहे.
संशोधकांनी या अभ्यासात माशांच्या संपूर्ण शरीराचा अभ्यास केला. माशांच्या पायांमुळे अनेक सूक्ष्मजंतू पसरले जात असल्याचे त्यांना दिसून आले. सूक्ष्मजंतूंचा प्रसार रोखण्यासाठी बाहेरील पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. घराभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी. घरातील खाद्यपदार्थ नीट झाकून ठेवावेत. तसेच कीटकनाशकांचा फवारा मारून जमिनीवर किंवा भिंतीवर बसलेल्या माश्यांचा नाश करावा, असे संशोधकांनी म्हटले आहे.