ध्यानधारणेमुळे वेदना निर्माण करणाऱ्या जनुकांचे आविष्करण कमी होऊन शारीरिक ताणापासून मुक्ती मिळते, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे.
विस्कॉन्सिन, स्पेन व फ्रान्स येथील संशोधकांनी केलेल्या नव्या अभ्यासानुसार जर ध्यानधारणा जाणीवपूर्वक केली तर जनुकांवर चांगला परिणाम दिसून येतो.
ध्यानधारणा करणाऱ्या व्यक्तींचा एक गट व एक अप्रशिक्षित नियंत्रित गट अशा दोन व्यक्तीगटांवर हा प्रयोग करण्यात आला. आठ तास ध्यानधारणा केल्यानंतर शरीरात जनुकीय व रेणवीय बदल घडून येतात व त्यात जनुकांचे नियंत्रण करणाऱ्या प्रणालीत बदल घडल्याने वेदनाकारक जनुकांचे आविष्करण होत नाही. त्यामुळे शारीरिक झीज किंवा ताणापासून मुक्ती मिळते.
सेंटर फॉर इनव्हेस्टिगेटिंग हेल्दी माइंडसचे संस्थापक रिचर्ड जे.डेव्हीडसन यांनी सांगितले की, ध्यानधारणेमुळे जनुकीय पातळीवर कुठले बदल घडून येतात याची सांगड घालणारे आमच्या मते हे पहिलेच संशोधन आहे.
या शोधनिबंधाचे एक लेखक पेरला कालीमन यांच्या मते, ज्या जनुकांचे आविष्करण कमी झाले ती जनुके नेमकी अशी आहेत ज्यांना वेदनाशामक औषधेही लक्ष्य करीत असतात. कालीमन हे स्पेनमधील इन्स्टिटय़ूट ऑफ बायोमेडिकल रीसर्च या संस्थेचे संशोधक आहेत.
एपिजेनेटिक्स शाखेतील हे संशोधन असून या जनुकांपैकी काही असे आहेत की, जे नियंत्रित केले किंवा त्यांचे आविष्करण कमी केले तर कॉर्टिसोल हे ताण कमी करणारे रसायन शरीरात सोडले जाते. त्यामुळे प्रेक्षकासमोर किंवा व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर आयत्यावेळी भाषण करणे किंवा आकडेमोडीचे खेळ करणे यासारख्या सामाजिक पातळीवरील कृतींमुळे निर्माण होणारा ताण कमी झाल्याचे लक्षात आले आहे. दोन गटातील लोकांमध्ये म्हणजे ध्यानधारणा करीत होते व जे करीत नव्हते त्यांची जी जनुके तपासण्यात आली त्यात काहीही फरक नव्हता. परंतु ध्यानधारणा करणाऱ्या गटातच वेदनाशामक परिणाम हे जनुकीय पातळीवर दिसून आले. त्याशिवाय डीएनएमध्ये दुरुस्ती करणाऱ्या इतर अनेक जनुकांमुळे दोन्ही गटात काहीच परिणाम दिसला नाही. ध्यानधारणा करणाऱ्या व्यक्तींमध्ये काही जनुकेच नियंत्रित झाली व ताण, वेदना कमी झाली.
सायको एंडोक्रायनोलॉजी या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.
ध्यानधारणा आणि वेदनेचे गणित
या संस्थेत रेणवीय विश्लेषणाचे प्रयोग करण्यात आले. ध्यानधारणेमुळे किंवा मनाच्या एकाग्रतेमुळे वेदनाकारक लक्षणे असलेल्या व्यक्तींमध्ये नेमके काय फायदे होतात, हे या संशोधनात दाखवून दिले आहे व त्याला अमेरिकन हार्ट असोसिएशनची मान्यता आहे. जैविक प्रणालीच्या अभ्यासाचा उपयोग त्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी होणार आहे, वेदना निर्माण करणाऱ्या जनुकांचे आविष्करण किंवा त्यांचे काम थांबवले गेले तर आपोआपच शरीराच्या वेदना कमी होतात व ध्यानधारणेमुळे हे शक्य होते. आरआयपीके २ व सीओएक्स २ ही दोन जनुके वेदनेला कारण ठरत असतात. त्याचबरोबर हिस्टोन डिअॅसिटिलेझ प्रकारातील जनुके ही सुद्धा शरीरात वेदना नियंत्रित करीत असतात.
ध्यानधारणेमुळे जनुकांत ताण नाहीसा करणारे बदल
ध्यानधारणेमुळे वेदना निर्माण करणाऱ्या जनुकांचे आविष्करण कमी होऊन शारीरिक ताणापासून मुक्ती मिळते, असे नवीन संशोधनात
First published on: 11-12-2013 at 12:10 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The worlds first research on relationship between genetic and meditation