हल्ली मेसेजिंग अॅप आणि सोशल मीडियाची चंगळ असणाऱ्या या दिवसांमध्ये आप्तजनांशी जोडलं जाण्यासाठी आपल्या हाताशी बरीच माध्यमं आहेत. पण, या सर्व माध्यमांपासून आपण जेव्हा दूर जातो तेव्हाच आपल्याला अशा काही गोष्टी गवसतात ज्या खऱ्या अर्थाने आपल्याला थक्क करुन जातात. स्पितीच्या खोऱ्याची सफर करण्यासाठी गेलो असता आम्हालाही अशाच काही गोष्टींनी, ठिकाणांनी थक्क केलं. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे हिक्कीम.
स्पिती व्हॅली म्हणा किंवा स्पितीचं खोरं निसर्गाची अगाध किमया नेमकी काय असते याची अनुभूती आपल्याला या ठिकाणी आल्यावर होते. अशा या ठिकाणी काझा येथे आम्ही थांबलो होते. राहण्याचं ठिकाण काझामध्ये अगदी सहजपणे सापडलं होतं. त्यानंतर आम्ही स्पितीचं सौंदर्यं अनुभवण्यासाठी म्हणून निघालो. याच सफरीदरम्यान आम्ही येऊन पोहोचलो सर्वाधिक उंचीवर स्थिरावलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये. जवळपास ४४४० मीटर म्हणजेच १४ हजार ५६७ फूट इतक्या उंचीवर स्थिरावलेलं हे पोस्ट ऑफिस आहे हिक्कीम या गावात. काझापासून साधारण पंधरा किलोमीटरच्या अंतरावर हे गाव असून, तेथे पोहोचण्यासाठी जवळपास ४५ मिनिटांचा प्रवास करावा लागतो. ५ नोव्हेंबर १९९३ पासून या पोस्ट ऑफिसची सुरुवात झाली. तेव्हापासून रिंचेंन चेरिंग Rinchen Chhering यांनी या पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमास्तर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. मुळच्या हिक्कीमच्याच रहिवासी असणाऱ्या चेरिंग यांनी मोठ्या आनंदाने एकट्याच्या खांद्यावर ही जबाबदारी घेतली आहे.
या पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या प्रश्नांची उत्तरं देत, न थकणाऱ्या चेरिंग यांच्या चेहऱ्यावर असणारं हास्य पाहता आपला क्षीण कुठच्या पळून जातो. इथे येणाऱ्या प्रवाशांचं स्वागत हिक्कीमचे रहिवासी आणि खुद्द चेरिगं मोठ्या उत्साहात करतात. फोन, इंटरनेट अशा कोणत्याही अत्याधुनिक सुविधांशिवायही निसर्गाच्या लीलांची फुल्ल रेंज असणाऱ्या या भागातलं हे पोस्ट ऑफिस म्हणजे आपल्या कुतूहलाचा विषय.
इथे आल्यावर प्रत्येकाचीच लगबग असते ती म्हणजे पत्र लिहिण्याची, सर्वाधिक उंचीवर स्थिरावलेल्या पोस्ट ऑफिसमधून आपल्या प्रियजनांना एक सुरेख असं पोस्टकार्ड पाठवण्याची. हे सर्व करत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भावच सर्वकाही सांगून जातात. इथे हे पोस्ट ऑफिस असण्याचं कारण म्हणजे जवळच्याच मॉनेस्ट्रीमध्ये असणाऱ्या बौद्ध मंकना पत्रव्यवहाराच्या माध्यमातून काही महत्त्वाची कामं करणं शक्य होऊ शकेल. इथे पोस्टाने पाठवलेलं पोस्टकार्ड टप्प्याटप्प्याने आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचतं. ज्यासाठी लागणारा कालावधी हा मात्र आपली परीक्षा पाहात असतो हेसुद्धा तितकच खरं. मीसुद्धा या पोस्ट ऑफिसमधून एक पोस्टकार्ड माझ्या आप्तजनांसाठी पाठवलं होतं. स्पितीचा माझा प्रवास संपला होता. पण, तरीही ते पोस्टकार्ड कधी एकदा येतं याचीच मी एका चातकासारखी वाट पाहात होते आणि स्पितीच्या स्मृतींना उजाळा देत अखेर ते आलंच.
*टीप- हिक्कीमपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काझा या ठिकाणाहून निघणं उत्तम ठरु शकेल. स्पिती व्हॅलीत फिरण्यासाठी काझा हा अनेकांचाच बेसकॅँप ठरतो. इथून तुम्ही एक दिवस भाडे तत्त्वावर बुलेट, अॅक्टीव्हा घेऊ शकता. किंवा मग जास्तजण असाल तर एखादं चारचाकी वाहनही इथे उपलब्ध होऊ शकेल. डोंगराळ वाटेतून आणि सुरेख अशा वातावरणातून भन्नाट अनुभव देणारा रस्ता तुम्हाला हिक्कीमपर्यंत पोहोचवतो.
इथे राहण्याची सोय नाही ही लक्षात घेण्याची बाब. हिक्कीमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याआधी एक लहानशी टपरी दिसते. तेथे गरमागरम चहा, मॅगी किंवा मग सूप त्या बोचऱ्या थंडीत तुम्हाला आधार देण्यासाठी सज्ज आहेच. तेव्हा मग पत्र लिहिण्यास निमित्त की… असं म्हणत प्रियजनांना पत्र पाठवण्यासाठी थेट हिक्कीमला जाण्याचा बेत आखताय ना?