स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) हा महिलांना काळजीत टाकणारा आजार. सद्यस्थितीत औषधोपचार आणि इतर पद्धतीने ब्रेस्ट कॅन्सर पूर्णपणे बरा होत असला, तरी या औषधौपचारांमध्ये केमोथेरपीचा समावेश अधिकवेळा असतोच. केमोथेरपीची अनेकांना भीती वाटते. पण सुरुवातीच्या टप्प्यातच ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले तर त्या रुग्णावर केमोथेरपी करण्याची गरज कमी असते, असे एका संशोधनातून दिसून आले आहे. केमोथेरपीशिवाय इतर उपचारांनाही हा आजार बरा केला जाऊ शकतो, असे संशोधनात आढळले आहे. ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
मल्टी-सेंटर युरोपिअन स्टडीतील संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार, सुरुवातीच्या टप्प्यातच ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यास ४६ टक्के महिलांना केमोथेरपीची गरज भासू शकत नाही. केमोथेरपीचे रुग्णाच्या शरीरावर इतरही परिणाम होत असतात. त्यामुळे त्याबद्दल रुग्णांच्या मनात भीती असतेच. त्यातच शस्त्रक्रियेनंतरही पुन्हा कॅन्सरची वाढ होऊ नये, यासाठी डॉक्टरांकडून केमोथेरपी करण्याचा सल्ला दिला जातो. पण नव्या संशोधनानुसार प्रत्येक रुग्णाला केमोथेरपीची गरज असतेच असे नाही.
संशोधकांनी मॅम्माप्रिंट नावाच्या एका चाचणीच्या माध्यमातून या संदर्भात संशोधन केले. ज्यामध्ये रुग्णाच्या शरीरातील गाठींचा अभ्यास करून कोणत्या रुग्णाला केमोथेरपीची गरज पडणार याची माहिती दिली जाते. गाठ परत वाढण्याची शक्यता किती जास्त आणि किती कमी याचा अभ्यास या चाचणीच्या माध्यमातून केला गेला. ज्यावेळी गाठ परत वाढण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसले, तिथेच केमोथेरपीची सल्ला रुग्णांना देण्यात आला. २००७ ते ११ या काळात सुमारे ६६०० रुग्णांची या माध्यमातून चाचणी करण्यात आली. ज्यांना सुरुवातीच्या टप्प्यातील ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे, त्यांचीच या पद्धतीने चाचणी करण्यात आली.
जर रुग्णाची वैद्यकीय चाचणी आणि आनुवंशिक पद्धतीने करण्यात आलेली चाचणी एकसमान आली तरच त्या रुग्णांना केमोथेरपीचा सल्ला देण्यात आल्याचे संशोधनात म्हटले आहे. जर या दोन्ही चाचण्याचे अहवाल नकारात्मक आले, तर त्यांना केमोथेरपी न करण्याचा सल्ला देण्यात आला.