फळांमध्ये आरोग्याला उपयुक्त असणारे अनेक घटक असतात. त्यामुळे आहारात फळांचा समावेश असायलाच हवा असे डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ यांच्याकडून देण्यात येते. केळ्यामध्येही आरोग्याला अतिशय उत्तम घटक असतात. पण हे घटक नेमके कोणते याबाबत आपल्यातील अनेकांना माहिती नसते. केळ्याबाबत आपल्याकडे अनेक गैरसमज रुढ असून त्यामुळे सर्दी होते किंवा केळे खाल्ल्याने आपण जाड होतो असे समजले जाते. पण प्रत्यक्षात तसे नसून केळ्याचे आरोग्यासाठी अनेक उपयोग होतात. पाहूयात काय आहेत केळे खाण्याचे फायदे…

अॅनिमियावर उपयुक्त

केळ्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्याने शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते. हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता असणाऱ्यांनी नियमित केळे खावे त्यामुळे अॅनिमियाचा त्रास उद्भवत नाही.

बद्धकोष्ठतेवर उपयुक्त

ज्यांना पचनाशी निगडीत त्रास असतात त्यांना केळे खाण्याचा चांगला फायदा होतो. केळ्यामध्ये असणारे फायबर्ससारखे घटक शौचाला साफ होण्यास मदत करतात. त्यामुळे बद्धकोष्ठता असणाऱ्यांनी केळे खावे, हा त्रास लगेच थांबतो.

ताकद वाढवण्यासाठी

केळ्यामध्ये असणारे घटक शरीराला ऊर्जा देतात. यामध्ये शर्करेचे प्रमाणही जास्त असते. शरीर कमावणाऱ्या लोकांना रोज भरपूर केळी खाण्यास सांगितले जाते. त्यामुळे दूधासोबत एक केळे खाल्यास कमी काळात जास्त ऊर्जा मिळते.

जुलाबावर फायदेशीर

जुलाब सुरू झाल्यास ते थांबण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो. यामध्ये घरातील वरिष्ठ महिला केळे खाण्यास सांगतात. लंघन करुन दिवसातून दोन ते तीन वेळा अर्धे अर्धे केळे खाल्ल्यास जुलाबावर चांगला परिणाम होतो.

रक्त पातळ करण्यासाठी उपयुक्त

केळं खाल्याने रक्तवाहिन्यातील रक्त पातळ होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होतो. केळ्यात असलेल्या मॅग्नेशियममुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि रक्त गोठून राहत नाही. त्यामुळे ज्यांना रक्त गोठण्याचा त्रास आहे त्यांनी केळे खावे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)