हॉटेलमध्ये किंवा अगदी घरीही जेवण झाले की, आपण बडीशेप खातो. खालेल्या अन्नाचे चांगल्या पद्धतीने पचन होण्यासाठी बडीशेप उपयुक्त असते इतकाच त्याचा उपयोग आपल्याला माहीत असतो. मात्र बडीशेप आरोग्याच्या इतरही अनेक तक्रारींवर फायदेशीर असते. अन्नपदार्थाची चव वाढविण्यासाठीही बडीशेप खातात. यामध्ये आरोग्याला उपयुक्त असणारे अनेक घटक असतात. यात तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनिज, मॅग्नेशियम, सेलेनियम, झिंक याचा समावेश असतो. रोज बडीशेप खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. पाहूयात याचे आरोग्यासाठी नेमके काय फायदे आहेत…
१. आरोग्याच्या तक्रारींपासून सुटका – तुम्हाला श्वसनाशी निगडीत त्रास होत असेल तर जेवणानंतर रोज बडीशेप खाल्लेली चांगली. शरीरातील अनावश्यक जीवाणू आणि विषाणूंचा नाश होण्यासाठी बडीशेप उत्तम काम करते.
२. शरीरातील अनावश्यक द्रव बाहेर टाकण्यास उपयुक्त – तुम्हाला सारखी लघवी लागत असेल तर तिच्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. याबरोबरच शरीरातील अनावश्यक विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे लघवीशी संबंधित तक्रारी दूर होतात.
३. रक्तशुद्धीकरणासाठी उपयुक्त – शरीर शुद्धीबरोबरच बडीशेपमुळे रक्त शुद्धीकरणाचेही काम होते.
४. त्वचेच्या तक्रारी दूर होण्यास मदत – दररोज बडीशेप खाल्ल्यास त्याचा आरोग्याला अतिशय चांगला फायदा होतो. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स दूर होण्यास मदत होते. शरीरातील हॉर्मोन्सची पातळी चांगली ठेवण्यासाठी तसेच त्वचा थंड ठेवण्यासाठी झिंक, कॅल्शियम आणि सेलेनियम हे बडीशेपमधील घटक परिणामकारक असतात.
५. हृदयाशी निगडीत तक्रारी दूर ठेवण्यास मदत – बडीशेप खाल्ल्याने हृदयाशी निगडीत आजार दूर होण्यास मदत होते. बडीशेपमधील पोटॅशियममुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो.