जगभरात किडनीच्या आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. अशावेळी रुग्णांना डायलिसिसची मदत घ्यावी लागते. तथापि, एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, क्रॉनिक किडनी डिसीजच्या रुग्णांनी वेळेवर उपचार न केल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. हे कदाचित प्राणघातकही ठरू शकते.
किडनी डिजीज क्वालिटी ऑफ लाइफ स्टडीमध्ये किडनीच्या २७८७ रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासामध्ये भाग घेणाऱ्या जवळपास ९८% लोकांना आपल्या शरीरात किमान एक लक्षण पाहायला मिळाले. २४% लोकांना छातीमध्ये त्रास जाणवला तर ८३% लोकांना थकवा जाणवला. यापैकी ६९० रुग्णांनी किडनी रिप्लेसमेंट थेरेपी सुरु केली, मात्र त्यातील ४९० रुग्णांचा ही थेरपी सुरु करण्याआधीच मृत्यू झाला. कारण या लोकांनी वेळीच गंभीर लक्षणांकडे लक्ष दिले नाही. डॉक्टरांनी सांगितले की किडनीच्या आजाराची लक्षणे गंभीर झाल्यास रुग्ण क्रॉनिक किडनी डिजीजला बळी पडतो. अशा प्रकरणांमध्ये रुग्णाला किडनी प्रत्यारोपणाची गरज असते.
प्रदूषणामुळे वाढतेय वंध्यत्वाची समस्या; केवळ पुरुषच नाही तर महिलांनाही बसतोय फटका; जाणून घ्या कसा
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला ६० वर्षांवरील लोकांना किडनीचा आजार व्हायचा. मात्र आजकाल कमी वयाच्या लोकांनाही या आजाराने घेरले आहे. किडनीच्या आजाराच्या प्रारंभिक लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. काहीवेळा संसर्गामुळे किडनी खराब होते आणि वेळेवर उपचार न केल्यास रुग्णाला डायलिसिसच्या आधाराची गरज भासते. मात्र प्रकरण जास्तच गंभीर असेल तर रुग्णाकडे डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपण हेच पर्याय उरतात. अशा परिस्थितीत, लोकांनी किडनीच्या आजाराच्या लक्षणांकडे लक्ष देणे आणि वेळेवर उपचार घेणे खूप महत्वाचे आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, केवळ लघवीद्वारेही किडनीचा आजार सहज ओळखता येतो. अशावेळी आपल्याला खालील लक्षणे दिसू शकतात.
- लघवी करताना जळजळ होणे
- लघवी करताना ओटीपोटात दुखणे
- दुर्गंधीयुक्त लघवी
- भूक न लागणे
- सकाळी उलट्या होणे
- लघवीमधून रक्त येणे
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)