Vegetarian Diet Recipes: अलीकडे शाकाहारी व त्याहीपेक्षा पुढे जाऊन व्हेगन जेवण जेवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, शाकाहारी आहार जुनाट आजारावर नैसर्गिक उपचार ठरू शकतो तसेच हे वजन कमी करण्यास मदत करते आणि पाचन आरोग्य सुधारण्यासही मदत करू शकते. शाकाहारी आहारामध्ये मांस, पूर्णतः वगळले जाते. पण बहुतांश वेळा, अंडी, मध आणि दुग्धजन्य पदार्थ मिळवण्यासाठी प्राण्याला प्रत्यक्षात मारले जात नसल्यामुळे, बहुसंख्य लोक यांचे सेवन शाकाहारी आहारातही करतात. तुम्हीही जर वजन कमी करण्याच्या मोहिमेवर असाल तर आणि तुमचेही डाएट शाकाहारी असेल तर आज आपण ५ पदार्थ पाहणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता.
वरण- भात किंवा डाळ खिचडी
आपण अनेकदा वजन कमी करण्यासाठी भात पूर्णपणे वर्ज्य करावा लागतो असे ऐकले असेल पण तुमच्या शरीराला भातातून मिळणाऱ्या कार्ब्सची सुद्धा तितकीच गरज असते. आपण यासाठीच आहारात वरण- भात किंवा डाळ खिचडी यासारखे कम्फर्ट फूड समाविष्ट करू शकता. आता यात ट्रिक अशी की तुम्ही खिचडी बनवतानाच तांदुळाच्या तुलनेत डाळ अधिक प्रमाणात घ्यायला हवी. जेणेकरून कार्ब्सचे प्रमाण मर्यादित व प्रोटीनचे प्रमाण मुबलक होऊ शकते. शिवाय पोटभरीचे जेवण झाल्याने तुम्हाला सतत उपाशी राहिल्यासारखे वाटणार नाही. आणखी हेल्दी पर्याय हवा असल्यास तुम्ही ब्राऊन राईस किंवा दलियाचा सुद्धा वापर करू शकता.
पालक पनीर
पालकाची हिरवीगार प्युरी आणि त्यात आपले घरगुती मसाले व पनीरचे मऊ तुकडे अशी रेसिपी पोटभरीची ठरू शकते. शरीराला आवश्यक लोह, मॅग्नेशियम, प्रोटीन,कॅल्शियम व फॅट्स मिळवून देण्याचे काम ही रेसिपी करते. उन्हाळ्यात पालक शरीराला थंडावा देण्यातही मदत करू शकतो. शक्यतो मसाल्याचे प्रमाण मर्यादित ठेवल्यास तुम्हाला पदार्थाची मूळ चव चाखता येईल.
कडधान्ये व रताळ्याची भाजी
रताळ्यामध्ये रेझिस्टन्स स्टार्च मोठ्या प्रमाणावर असते आणि प्रत्येक ग्रॅममध्ये किमान १ ते २ कॅलरीज असतात. साखर आणि अन्य प्रोटीन स्रोतांपेक्षा हे प्रमाण 25% कमी आहे. शिवाय मसूर डाळ किंवा अन्य कडधान्ये आतड्यांतील फायदेशीर जीवाणूंना मदत करतात आणि इन्सुलिन प्रतिरोध कमी करताना पचन सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे ही रताळे व कडधान्याची भाजी किंवा सूप वजन कमी करण्यास मदत करू शकते. शिवाय आपल्या आवडत्या बटाट्याला हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
सोया- टोफू पराठे
वजन कमी करण्यासाठी त्यांच्या फायद्यांव्यतिरिक्त, सोयाबीन रजोनिवृत्तीची लक्षणे, पीएमएस लक्षणे आणि अनियमित मासिक पाळी आणि स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी देखील मदत करते असे दिसून आले आहे. पनीरमध्ये असलेले कोलेस्टेरॉल आणि ग्रोथ हार्मोन्सशिवाय टोफूमध्ये सर्व प्रथिने आणि कॅल्शियम असते. पनीरला पर्याय असलेल्या टोफूमध्ये कोलेस्टेरॉल नगण्य असते. या पराठ्याने तुम्ही तुमचे डिनर आणखी टेस्टी करू शकता.
हे ही वाचा<< शाही, बटर मसाला भाजी बनवताना हॉटेलसारखी घट्ट ग्रेव्ही होत नाही? ‘या’ १० टिप्स वापरून म्हणाल, पैसे वाचले!
भेंडी मसाला
भेंडी मधील चिकटपणा हा पोट साफ करण्यास अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. योग्य पद्धतीने कमी तेल व मसाल्यांमध्ये भेंडीची भाजी बनवल्यास याचा शरीराला नक्कीच फायदा होऊ शकतो. भेंडी ही सेक्श्युअल लाईफमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी कामी येऊ शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)