बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा ही समस्या वाढत चालली आहे. बैठी कामाचे स्वरूप, पुरेसा व्यायाम न करणे, जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक, आहारात जंक फुडचा भडीमार यांमुळे वजन लगेच वाढते. वजन वाढल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जराही वजन वाढले की ते नियंत्रणात ठेवण्यासाठी आजकाल सर्वजण प्रयत्न करताना दिसतात. खाण्यावर नियंत्रण, त्यासाठी बनवलेला डाएट प्लॅन अशा गोष्टी करूनही काहीवेळा वजन कमी होत नाही, कारण याला तुमच्या काही सवयी कारणीभूत ठरतात. कोणत्या आहेत त्या सवयी जाणून घ्या.
वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत पुढील सवयी अडथळा ठरू शकतात
उपाशी राहणे
वजन कमी करायचे ठरवल्यानंतर सर्वात आधी जेवणावर नियंत्रण ठेवले जाते. पण काहीजण अतिप्रमाणात जेवणावर नियंत्रण ठेवतात, एक वेळच जेवण टाळतात किंवा खूप कमी जेवतात. असे केल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. शरीरालादररोज आवश्यक पोषक तत्वे मिळणे गरजेचे असते, तसे न झाल्यास थकवा, डिहायड्रेशन, निस्तेज त्वचा, केस गळणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याशी निगडित इतर कोणत्याही समस्या उद्भवू नयेत यासाठी दररोज योग्य प्रमाणात जेवणे आवश्यक असते, असे करूनही वजन नियंत्रणात ठेवता येते.
आणखी वाचा : तमालपत्र आरोग्यासाठी ठरते गुणकारी! जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे
फॅट असणारे पदार्थ टाळणे
फॅट असणाऱ्या पदार्थांमुळे वजन वाढते असे अनेकांना वाटते, त्यामुळे ते पुर्णपणे फॅट फ्री आहार घेतात. पण शरीराला थोड्या प्रमाणात फॅटची गरज असते. तसेच वजन कमी करण्यासाठी आहारात योग्य प्रमाणात फॅट असणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे फॅट फ्री आहार घेणे टाळा.
अति व्यायाम करणे
काहीजण लवकर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात जास्तीत जास्त व्यायाम करतात. पण यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच तज्ञांच्या सल्ल्याशिवाय दोन तासांपेक्षा अधिक वेळ व्यायाम करू नये. तुमच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केल्यास त्याचा शरीरावर आणि मनावर ताण पडू शकतो. त्यामुळे अति व्यायाम करणे टाळा.
आहरात केवळ फळांचा रस घेणे
काहीजण वजन कमी करण्यासाठी आहारात फक्त द्रव्य पदार्थ म्हणजे फळांचा रसच घेतात. पण यामुळे फॅट बर्न होत नाही, कारण वजन कमी करण्यासाठी आवश्यक असणारे फायबर यात नसते.
आणखी वाचा : पायांच्या स्नायूंमध्ये सतत वेदना जाणवतात का? ‘हे’ सोपे उपाय करून पाहा लगेच जाणवेल फरक
पुरेशी झोप न घेणे
पुरेशी झोप न घेतल्यास वजन कमी होण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घेतल्यानंतर मेटाबॉलिजम सुधारते, ज्यामुळे अन्नपचन नीट होऊन वजन कमी होण्यास मदत मिळते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)